Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: ANI)

प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत पुरुन ठेवल्याची अत्यंत धक्कादायक घटना पालघर (Palghar) येथून समोर आली आहे. लग्नाची खरेदी करण्यासाठी जात असल्याचे सांगत हे प्रेमी युगूल घराबाहेर पडले होते. मात्र त्याच रात्री प्रियकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह भिंतीमध्ये पुरला. विशेष म्हणजे मृतदेह घराच्या भिंतीत पुरुन प्रियकर त्याच घरात तब्बल 4 महिन्यांपासून राहत आहे. हे दोघेही उमरोळी येथील असून सध्या वाणगाव येथील वृंदावन दर्शन इमारतीमध्ये वास्तव्यास होते. अमिता मोहिते असे मृत मुलीचे नाव असून मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. (Satara: सातारा जिल्ह्यातील जवानाची हत्या; पत्नी, भावजय आणि मेहुण्यानेचं काढला काटा)

उमरोळी येथे राहणारी अमिता मोहिते हिच्या प्रियकराने लग्नाची खरेदी करण्याचे कारण देत 21 ऑक्टोबर रोजी तिला घेऊन निघाला. मात्र मुलगी घरी परतली नसल्याने कुटुंबिय तिच्या शोधात होते. अमिता जीवंत आहे हे भासवण्यासाठी आरोपी प्रियकर तिचं सोशल मीडिया अकाऊंट वापरत होता. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुलीच्या कुटुंबियांच्याही संपर्कात होता. मात्र त्याची ही युक्ती फारशी कामी आली नाही. मुलीच्या कुटुंबियांना संशय आला आणि त्यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Mumbai: धावत्या ट्रेनमधून पतीने पत्नीला ढकलले; महिन्याभरापूर्वीच झाले होते लग्न)

पोलिसांनी शोध घेत प्रियकराला ताब्यात घेतलं. प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत गाठल्याची कबुली आरोपीने चौकशीदरम्यान दिली आहे. तसंच मृतदेह पुरण्यासाठी भिंतही त्याने उभारली असल्याचेही आरोपीने सांगितले. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यापासून आरोपी प्रियकर त्याच घरात राहत आहे. दरम्यान, हत्येमागे नेमके काय कारण होते, आरोपीचे इतर कोणी साथीदार आहेत का याचा पोलिस अधिक तपास करत आहेत.