Satara: सातारा जिल्ह्यातील जवानाची हत्या; पत्नी, भावजय आणि मेहुण्यानेचं काढला काटा
Murder | (Photo Credits: PixaBay)

सातारा (Satara) जिल्ह्यात जवानाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे जवानाच्या पत्नीने भावजय आणि मेहूण्याच्या मदतीने आपल्या पतीचा काटा काढला आहे. संदीप जयसिंग पवार असं या सैनिकाचं नाव होतं. आरोपी पत्नीने पत्नीने अज्ञाताच्या मारहाणीनंतर संदीप यांचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी संदीप यांची पत्नी, भावजय आणि मेहूण्याला अटक केली आहे.

संदीप पवार हे साताऱ्यातील सैदापूर येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते सुट्टीत आपल्या गावी आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी संदीप यांना मारहाण करुन जखमी केले, असा बनाव त्यांच्या पत्नीने रचला होता. मारहाणीनंतर संदीप यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, उपचारादरम्यान संदीप यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - मुंबई: खार येथे नववर्षाच्या पार्टीत 19 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक)

संदीप यांच्या पत्नीने पतीला मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी या प्रकरणाची खोलवर चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी संदीप यांच्या घरातील सदस्य, नातेवाईक आणि गावातील लोकांची चौकशी केली. यात पोलिसांना संदीप यांचे कुटुंब काहीतरी लपवत असल्याचं समजलं. त्यामुळे पोलिसांनी संदीप यांच्या कुटुंबातील सदस्यांची कसून चौकशी केली. (वाचा - ठाणे येथे नवं वर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या 416 जणांसह 200 सह प्रवाशांवर कारवाई)

दरम्यान, यात संदीप यांची हत्या त्यांच्या पत्नीने भावजय आणि मेहूण्याच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले. सुट्टीवर आल्यानंतर संदीप कुटुंबियांना दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा आरोप पत्नीने केला आहे. संदीप यांच्या त्रासाला कंटाळून त्यांना मारहाण केल्याची कबूली आरोपी पत्नीने दिली आहे. या सर्व प्रकरणानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.