
Mumbai News: मुंबईतील रस्त्यांवर सध्या प्रचंड खोदकाम सुरू असून, शहराचे चित्र अक्षरशः उध्वस्त झाले आहे. मुंबई महापालिकेने रस्ता काँक्रीटीकरणाच्या (BMC Road Concreting) नावाखाली प्रत्येक गल्ली-बोळात उखडलेले रस्ते, उभ्या केलेल्या लोखंडी अडथळ्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रु. 12,000 कोटी खर्चाच्या या बीएमसी प्रकल्पामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, धूळधक्कड आणि अपुरे पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. बीएमसीने 702 किमी लांबीचे रस्ते काँक्रीटमध्ये रूपांतर करण्याचा निर्धार केला असला तरी, या कामात आवश्यक समन्वयाचा आणि नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. अनेक ठिकाणी रस्ते प्रथम काँक्रीट केले जातात आणि नंतर विसरलेली पाईपलाईन किंवा केबल टाकण्यासाठी पुन्हा खोदले जातात.
आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम
शहरामध्ये काँक्रीटीकरणाच्या नियोजनशून्य कामांमुळे मुंबई शहरातील आपत्कालीन सेवा अत्यंत प्रभावित झाल्या आहेत. अनेक रुग्णालयांच्या रस्त्यांवर खोदकाम सुरू असल्याने पर्यायी मार्गच उरलेले नाहीत. त्यामुळे अॅम्ब्युलन्सना अनेकदा दूरचा वळसा मारून जायला लागते आणि रुग्णांना वेळेवर उपचार न मिळण्याचा धोका वाढतो आहे. (हेही वाचा, Mumbai Metro Achieves Major Milestone: मुंबई मेट्रोने गाठला ऐतिहासिक टप्पा; लाइन 7A साठी TBM ‘दिशा’चा पहिला भुयारी बोगदा पूर्ण)
2016 मध्ये लागू झालेल्या दिव्यांग हक्क कायद्यानुसार (RPwD Act, 2016), सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये दिव्यांगांसाठी प्रवेशयोग्यता बंधनकारक आहे. मात्र मुंबईतील फुटपाथ्स आणि रस्ते अजूनही अनुपलब्ध, उखडलेले आणि धोकादायक आहेत.
खरे मूळ कारण: भूमिगत युटिलिटी डक्ट्सचा अभाव
अनेक तज्ज्ञांच्या मते, भूमिगत युटिलिटी डक्ट्स नसल्यामुळेच प्रत्येक वेळेस केबल्स किंवा पाईप्ससाठी रस्ते पुन्हा-पुन्हा खोदले जात आहेत. शहर व्यवस्थापनाचे अभ्यासक, नागरिक आणि अनेक तज्ज्ञ सांगतात की, डक्ट्स नसल्यामुळे प्रत्येक वेळेस काँक्रीट रस्त्यांचीही तोडफोड करावी लागते. हा निव्वळ प्रशासनाचा अकार्यक्षमपणा आहे. कामं टप्प्याटप्प्याने व्हायला हवी होती. पण, सगळी कामे एकत्रच काढली आहेत. ज्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा पाहायला मिळत आहे. पादचाऱ्यांसाठी अडथळे किंवा सुरक्षित मार्ग दिलेले नाहीत. मनपायुक्त आयुक्तांनी नुकतेच सर्वत्र एकाच वेळी खोदकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत, पण जोपर्यंत तो आदेश येईपर्यंत शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदून ठेवले आहेत.
रस्ते काँक्रीटीकरणाचे कारण काय?
वारंवार देखभाल करावी लागत असल्याने होणारा खर्च टाळण्यासाठी डांबरी रस्त्यांचे काँक्रीटीकर करण्याची महत्त्वाकांक्षी योजना बीएमसीने हाती घेतली. यायोजनेच्या नावाखाली 2023 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांपासून मुक्ती मिळवणे हा होता. बीएमसीच्या मते, काँक्रीट रस्ते किमान 20 वर्षे टिकतात, तर डांबरी रस्ते 5 वर्षांपेक्षा जास्त टिकत नाहीत. खड्ड्यांचे डागडुजीही खर्चिक ठरते.
BMCच्या अखत्यारीतील 2050 किमीपैकी 1224 किमी रस्ते आधीच काँक्रीट करण्यात आले आहेत. 2027 पर्यंत सर्व रस्ते काँक्रीट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाची आकडेवारी (5 एप्रिल 2025 पर्यंत):
- बीएमसीच्या देखरेखीतील एकूण रस्ते: 2050 किमी
- यापैकी काँक्रीटीकरण झालेले रस्ते: 1224 किमी
- सध्या खोदलेले रस्ते: 525 किमी
- 31 मेपर्यंत पूर्ण करायचे लक्ष्य: 324 किमी
- दोन टप्प्यांत काँक्रीटीकरण होणाऱ्या रस्त्यांची लांबी: 702 किमी (एकूण 2121 स्ट्रेचेस)
दरम्यान, पावसाळा तोंडावर असताना शहरातील खोदकाम थांबून रस्त्यांचे काम पूर्ण होईल का, हा मोठा प्रश्न आहे. अपूर्ण नियोजन, दिरंगाई आणि गैरप्रकारांविरोधात नागरिक अधिकच अस्वस्थ झाले आहेत. बीएमसी आपल्या नियोजनावर ठाम असल्याचं दाखवत असली, तरी नागरिकांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागतो आहे—तेही प्रत्येक खोदलेल्या गल्लीतून.