
मुंबईच्या झपाट्याने विस्तारत असलेल्या मेट्रो (Mumbai Metro) नेटवर्कसाठी 17 एप्रिल 2025 हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुंबई मेट्रो लाईन 7A प्रकल्पासाठी कार्यरत असलेल्या टनेल बोरिंग मशीन (TBM) ‘दिशा’ ने यशस्वीपणे 1.647 किमी लांबीचा भुयारी बोगदा पूर्ण केला आहे, जो अंधेरी (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) यांना जोडतो. सुमारे 6.35 मीटर अंतिम व्यास असलेला हा बोगदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून बांधण्यात आलेला पहिला भुयारी मेट्रो बोगदा आहे. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रगतीला 'अभियांत्रिकीचा चमत्कार' असे संबोधले आणि दहिसर ते गुंडवली पर्यंत चालणाऱ्या रेड लाईन (लाईन 7) ला विमानतळ विस्ताराशी जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण लिंकचे हे यश असल्याचे सांगितले.
लाईन 2B मध्ये वीज पुरवठा आणि यशस्वी चाचणी
लाइन 7A च्या भुयारी कामासोबतच मुंबई मेट्रो यलो लाईन 2B ने देखील वेगवान कामगिरी करत आहे. चेंबूरमधील डायमंड गार्डन आणि मानखुर्दमधील मंडाळे यांच्यामधील 5.4 किमी अंतर असलेल्या मार्गावर 14 एप्रिल 2025 रोजी ओव्हरहेड वायरना वीज पुरवठा सुरू झाला. (हेही वाचा, Mumbai Metro Line 7A: मुंबई मेट्रो लाईन 7A चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण; ‘दिशा’ टनल बोरिंग मशीनमुळे विमानतळ मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती)
मेट्रो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल 2025 रोजी या मार्गावर पहिली यशस्वी चाचणी धावली. हे यलो लाईन पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पूर्व उपनगरांसाठी 10 वर्षांनंतर मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे. याआधी केवळ ब्लू लाईन 1 गाठकोपर परिसरात सुरु करण्यात आली होती.
प्रवाशांसाठी आधुनिक आणि सुविधा-संपन्न कोचेस
लाईन 2B साठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या Bharat Earth Movers Limited (BEML) कडून तयार करण्यात आल्या असून, त्या सिक्स-कोच ऑल-स्टील रेल डबे आहेत. या गाड्यांमध्ये ऊर्जासंपन्न रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम, IP बेस्ड उद्घोषणा प्रणाली, मोबाईल चार्जिंग स्टेशन, सायकलसाठी जागा, आणि प्रत्येक बाजूला चार दरवाजे अशा आधुनिक सुविधा दिल्या आहेत. (हेही वाचा, Mumbai Metro Aqua Line: आता प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला झटपट पोहचणार; पहा सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनची झलक (Check Pic))
प्रशासनाने डिसेंबर 2025 पर्यंत लाईन 2B सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. यामुळे मानखुर्द ते चेंबूर दरम्यानचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होईल तसेच रस्त्यावरील वाहतूकही कमी होईल. लाईन 7A च्या भुयारी प्रगतीसह आणि लाईन 2B च्या यशस्वी चाचणीमुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीत लवकरच मोठी क्रांती घडणार असल्याची चिन्हे आहेत.