मुंबई महापालिकेला केंद्राकडून आतापर्यंत 446 व्हेंटिलेटर्सचा पुरवठा, COVID19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 70 टक्क्यांवर- BMC
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह आता औरंगाबाद ही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेकडून नियमितपणे मुंबईतील कोरोनाबधितांची आकडेवारी जाहीर करण्यात येते. याच दरम्यान आता मुंबईसाठी एक दिलासादायक बातमी असून शहरातील कोविड19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट हा 70 टक्क्यांवर पोहचल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत महापालिकेला केंद्र सरकारकडून 446 व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने पुढे असे ही म्हटले आहे की, पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून या व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. हे सर्व व्हेंटिलेटर्स एकत्रितपणे नव्हे तर टप्प्याटप्प्याने देण्यात आलेले आहेत. केंद्राकडून देण्यात आलेले हे व्हेंटिलेटर्स विविध कोविडच्या रुग्णालयात पुरवले जात असल्याचे ही महापालिकेने स्पष्ट केले आहे.(महाराष्ट्र: मार्च महिन्यापासून 82 पोलीस कर्मचाऱ्यांचा COVID19 मुळे मृत्यू, अधिकाऱ्यांची माहिती)

कोविडच्या रुग्णांसाठी सध्या एकूण 1053 व्हेंटिलेटर्स अॅक्टिव्ह असून त्यापैकी 125 वापरले जात नाहीत. कारण मुंबईत कोरोनाचे तेवढे रुग्ण नाही आहेत. त्यामुळे हे व्हेंटिलेटर्स लावण्यात आले आहेत पण त्याचा वापर करण्यात येत नाही. याचा अर्थ असा नाही की व्हेंटिलेटर्स धुळ खात आहेत. तर मुंबईतील कोरोनाची परिस्थिती सुधारत असून पुरेशे व्हेंटिलेटर्स असून त्याची अधिक आवश्यकता नसल्याचे ही महापालिकेने म्हटले आहे.(कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजारांवर पोहचला, परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता)

दरम्यान,  राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास आकडा 2,54,427 वर पोहचला असून 103516 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 10289 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील दिलासादायक भाग असा की, कोरोनाला हरवणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 1,49,007 इतकी झाली आहे.