महाराष्ट्र: मार्च महिन्यापासून 82 पोलीस कर्मचाऱ्यांचा COVID19 मुळे मृत्यू, अधिकाऱ्यांची माहिती
Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून सरकारकडून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर कोविड वॉर्रिअर्सचा भाग असलेल्या राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान आता मार्च महिन्यापासून ते आतापर्यंत 82 पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे कोविड19 मुळे निधन झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.(मुंबई: आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह)

आतापर्यंत 6,400 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 5,100 जणांची प्रकृती सुधारली असून अद्याप 1213 जण त्यातील 150 अधिकारी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात कोरोनासंबंधित उपचार करण्यात येत आहेत. तर 48 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यात अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. तर मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा आकडा अधिक असल्याचे ही अधिकारी यांनी पुढे म्हटले आहे.(Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी पहा)

दरम्यान, लॉकडाऊन लागू केल्यानंतर मार्च महिन्यापासून पोलीसांवर हल्ले केल्याच्या 313 घटना समोर आल्या आहेत. तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर ही हल्ले केल्याच्या 54 घटना समोर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास आकडा 2,54,427 वर पोहचला असून 103516 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 10289 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील दिलासादायक भाग असा की, कोरोनाला हरवणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 1,49,007 इतकी झाली आहे. राज्यात कोरोना रिकव्हरी रेट हा 55 टक्क्यांहून अधिक असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येतेय. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट मुंबई शहरात सुद्धा मागील काही काळात पहिल्यांदा 1000 हुन कमी कोरोना रुग्ण समोर आले आहेत, त्यामुळे मुंबई हळूहळू कोरोनावर मात करण्याच्या मार्गावर आहे असा अंदाज लावायला हरकत नाही.