
मुंबई महानगर पालिकेकडून नुकतेच कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर इमारत किंवा सोसायटी सील करण्याबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमावलीनुसार, आता एखादा कोरोनाबाधित रूग्ण इमारतीमध्ये असल्यास सारी इमारत किंवा सोसायटी सील करण्याची गरज नसून विशिष्ट मजला आणि सार्वजनिक भाग सील केला जाईल. दरम्यान रूग्णामध्ये लक्षण असल्यास त्याला खाजगी किंवा सरकारी रूग्णालयामध्ये ठेवण्यात येईल. मात्र Asymptomatic कोरोनाबाधित असल्यास त्याला होम क्वारंटीन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी रूग्णाच्या घरातील स्थिती पाहून हा नियम व्यक्तीपरत्वे बदलू शकतो. तर घरामध्ये मुबलक जागा, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असेल तर कोरोनाबाधितच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टला देखील होम क्वारंटीन केले जाईल. त्यासाठी एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म असेल.
दरम्यान पालिकेकडून कोरोनाबाधित रूग्ण आढळलेल्या टोलेजंग इमारतीची विंग, मजला, लिफ्ट, लॉबी निर्जुंतुक केली जाईल. मात्र रूग्ण संख्या पाहून किती प्रमाणात इमारत सील केली जाईल त्याचा निर्णय पालिका अधिकारी घेतील. अशी माहिती TOI च्या वृत्तामधून समोर आली आहे. तर अगदीच लहान इमारतींमध्ये, वस्तीमध्ये पूर्ण लॉकडाऊन असेल.
पालिका प्रशासनाकडून सोसायटीच्या संबंधित व्यक्तींना क्वारंटीनचे नियम समजावून सांगतील. सध्या मुंबईमध्ये झपाट्याने रूग्ण संख्या वाढत आहे. अशामध्ये कोरोनाबाधित, होम क्वारंटीन लोकांबाबत अनेक समज गैरसमज आहे. मात्र नागरिकांनी या रूग्णांशी माणूसकीने वागावं असं आवाहन करण्यात आलं आहे. कटेंनमेंट झोनमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर होणार कारवाई; लॉक डाऊनबाबत BMC ने उचलले कडक पाऊल.
दरम्यान 18 मे पासून लागू करण्यात लॉकडाऊन 4 मध्ये केंद्र सरकारने काही नियमावली देऊन राज्य सरकारला रेड, ऑरेंज, ग्रीन झोन तसेच कंटेन्मेंट झोन ठरवण्याबाबतचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे मुंबई शहरामध्ये आता रूग्णाची संख्या आणि त्याचा आरोग्य यंत्रणेवर येणार भार पाहता काही नियमांमध्ये बदल सूचवण्यात आले आहेत.