सध्या जगभरातील जवळपास 190 देश कोरोना व्हायरस (Coronavirus) या प्राणघातक विषाणूशी झुंज देत आहेत. आतापर्यंत 7.7 दशलक्षांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर भारतातही ही संख्या 90 हजारांच्या पुढे गेली आहे. देशात मुंबई (Mumbai) हे या विषाणूमुळे सर्वात बाधित शहर आहेत. शहरात लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे, मात्र अनेकवेळा या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. अशात कोरोना विषाणूचा धोका रोखण्यासाठी मुंबई पालिकेने (BMC) कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, कंटेन्मेंट झोनमधील सील इमारतींमध्ये कायद्याचे उल्लंघन झाल्यास आता बिल्डिंग सोसायटीच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात जावे लागू शकते.
बीएमसीने कटेंनमेंट क्षेत्रातील नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सोसायटीचे पदाधिकारी, अध्यक्ष व सचिव यांना सोपविली आहे. जर रहिवासी या नियमांचे उल्लंघन करीत असतील तर, आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत सोसायटीच्या व्यवस्थापनाविरूद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तसेच जर का एखादा मनुष्य इतरांचे आरोग्य किंवा सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करत असेल, तर या कलमाचे उल्लंघन केल्यास एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा किंवा 200 रुपये दंड होऊ शकतो.
मुंबईतील माटुंगा, सायन, दादर आणि वडाळा येथे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. महानगरपालिकेचे म्हणणे आहे की, साथीच्या काळात पोलिस संपूर्ण शहरावर चोवीस तास लक्ष ठेऊ शकत नाहीत, त्यामुळे नियमांचे पालन करून घेणे हे हाऊसिंग सोसायटीवर अवलंबून असते. मुंबई महानगरपालिका आता मुंबईतील प्रत्येक प्रभागातील गृहनिर्माण क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांना अशा प्रकारच्या नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे. आपण आपल्या सोसायटीमधील सर्व सदस्यांना सामाजिक अंतर राखण्याबद्दल आणि शासनाच्या सूचनांचे अनुसरण करण्याविषयी माहिती द्या, असे आदेश बीएमसीने विविध सोसायट्यांना दिले आहेत.