Pune Police message to students amid Covid 19 Lockdown (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसमुळे सध्या राज्यात अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या विविध ठिकाणी अडलेल्या लोकांचे हाल होत आहेत. दरम्यान राज्याच्या मुंबई, पुणे या शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक आहेत. यातच लॉकडाऊनचा कालावधीत वाढत आहे. त्यामुळे राज्य किंवा देशातील विविध भागातून पुण्यात शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी अडकून पडले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांनी "आहात तिथेच थांबा आणि सहकार्य करा," असे आवाहन केले आहे. यासाठी पुणे पोलिसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देण्यात आला आहे. (तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)

"भविष्याची स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात आले. या भयंकर परिस्थितीत अनेकांनी शहराची साथ सोडली असली तरी काहीजण अजूनही तग धरुन आहेत. या कठीण काळात तुमची, तुमचे पालक, नातेवाईक यांची काय मनःस्थिती आहे, याची मला जाणीव आहे. आताची परिस्थिती नक्कीच प्रतिकूल आहे. पण या प्रतिकूल परिस्थितीवर मात केल्याने तुम्हाला नक्कीच मोठे नैतिक बळ मिळेल. त्यामुळे हिंमत दाखवा आणि शहरं सोडू नका," असे कळकळीचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. "पुणे शहर रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे इथून जाताना तुम्ही तुमच्या गावाकडे कदाचित धोका नेवू शकता. हे योग्य आहे का?" असा प्रश्नही विद्यार्थ्यांना विचारण्यात आला आहे.

"प्रशासकीय अधिकारी म्हणून तयारी करताना तुमच्याकडून हिंमत दाखवण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी तुमच्या प्रमाणे अनेक विद्यार्थी या शहरात प्रशासकीय सेवेसाठी तयारी करत होते. तेच आता ही गंभीर परिस्थिती उत्तमरित्या हाताळत आहेत," असेही पुणे पोलिस आयुक्त म्हणाले. "इथे थांबा आणि अभ्यास करा, यामुळे तुमचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे तुम्ही भविष्यात माझी आठवण काढाल," असे आयुक्त म्हणाले. "काळजी करु नका, काळजी घ्या," असं म्हणत आयुक्तांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक संदेश दिला आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी 3 व्हॉट्सअॅप क्रमांकही व्हिडिओत देण्यात आले आहेत.

पहा व्हिडिओ:

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 30706 वर पोहचला आहे. तर 22498 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर 7088 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे 1135 रुग्णांचा बळी गेला आहे. कोविड 19 च्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊनचा कालवधी 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्यापासून सुरु होणार असून त्याचे स्वरुप लवकरच जनतेसमोर स्पष्ट केले जाईल.