Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

कोविड-19 लसीकरणाचा (Covid-19 Vaccination) वेग वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्य सेवकांसाठी नवी योजना राबवली आहे. वॉक इन व्हॅक्सिनेशनच्या (Walk-in Vaccination) माध्यमातून मुंबईतील आरोग्य सेवकांना जवळच्या कोणत्याही केंद्रावर लस टोचून घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कोविन अॅपवर (CoWIN-App) नोंदणी केलेल्या आरोग्य सेवकांना आता कोणत्याही केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. याचाच अर्थ असा की, बीएमसीने ठरवून दिलेल्या स्लॉट व्यतिरिक्त जरी आरोग्यसेवक केंद्रावर गेले तर त्यांना लस देण्यात येईल. मात्र त्यासाठी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रर करणे आवश्यक आहे. (Coronavirus Vaccination Process: तुम्हाला कोरोना लस घ्यायची आहे का? जाणून घ्या लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया)

बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत टर्नओव्हर 50% वाढला आहे आणि आरोग्य सेवकांना लसी देण्याची प्रक्रीयाही वेग घेईल. बुधवारी, पालिकेच्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी 3,300 आरोग्यसेवकांना लस देण्याचे ठरले होते. मात्र त्यापैकी 1,728 म्हणजेच 52% आरोग्यसेवकांना लस देण्यात आली. मुंबईत आतापर्यंत एकूण 5,251 आरोग्यसेवकांना लस देण्यात आली आहे. दरम्यान, लस दिलेल्या 7 जणांवर किरकोळ दुष्परिणाम दिसून आले. त्यामुळे अर्ध्या तासाच्या निगराणीनंतर त्यांना घरी पाठण्यात आले. (Covid 19 Vaccination: महाराष्ट्रात पुन्हा कोविड 19 लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या केंद्राने राज्य निहाय दिलेल्या वेळापत्रकाची माहिती)

गेल्या दोन दिवसांपासून स्थगित असलेले लसीकरण पुन्हा सुरु करण्यात आले आहे. आठवड्यातील 4 दिवसांत सुमारे 4000 आरोग्य सेवकांना लस देण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी लसीकरण होणार आहे. सुमारे दहा कोटी लोकांसाठी लस साठवून ठेवण्याची पालिकेची क्षमता असून लसीकरण करण्याची दिवसाची क्षमता पालिका 50,000 पर्यंत वाढवू शकते आणि खासगी रुग्णालये गुंतल्यास ही संख्या 100,000 पर्यंत वाढू शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.