मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सात तलावांची सद्यस्थिती पाहता मुंबईकरांवर सध्या पाणी कपातीचं संकट घोंघावत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असल्याने मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्यांनी 10% पाणी कपात करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
आज ( बुधवार ) स्थायी समिती समोर मंजुरीसाठी पाणी कपातीचा निर्णय ठेवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर लगेजच तो अंमलात आणला जाणार आहे. यंदा जून,जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारल्याने मुंबईच्या तलावाच्या मागील वर्षाच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी प्रमाणात आहे.
कमर्शिअल आणि घरगुती अशा दोन्ही ठिकाणी 10% पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबईच्या काही भागात यापूर्वीच पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 16% पाणी कमी आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांमध्ये 11 लाख मिलियन लिटर पाणी आहे. पाणी बचतीसाठी आत्तापासूनच प्रयत्न न केल्यास भविष्यात हा साठा रिझर्व्हमध्ये जाण्याची शक्यता आहे.