एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकासाघाडी सरकार कोसळले. त्यानंतर महाविकासाघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेण्याचा सपाटा लावला. निर्णय बदलून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकामागून एक धक्के देत असतानाच आता महाविकासाघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेही तक्रार केली आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तत्कालीन सरकारने प्रभागरचना आणि सोडत बेकायदेशीर मार्गाने केल्याचे सांगत प्रभागरचना आणि वॉर्ड आरक्षण रद्क करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे. याबाबत फडणवीस यांनी देवरा यांना सोशल मीडियावर प्रतिसादही दिला आहे.
मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तत्कालीन राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची रचना केली. फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या या प्रभाग रचनेविरोधात अनेक राजकीय आणि अराजकीय विरोध दर्शवणारी जवळपास 800 पत्रे प्राप्त झाली. या पत्रांचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे होते. मात्र तत्कालीन राज्य सरकारने याची कोणतीही दखल घेतली नाही. हे खेदाने नमूद करावे वाटते. (हेही वाचा, Amit Thackeray In Shinde Cabinet: राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात स्थान? भाजपा आणखी एका धक्कातंत्राच्या तयारीत, शिवसेनेला शह देण्यासाठी खेळी?)
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागाची पुनर्रचना आणि आरक्षण सोडत लागू करण्यात आली. त्याचा फायदा केवळ एकाच पक्षाला होईल असे लक्षात आले. 2017 साली काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या महापालिकेच्या 30 जागांपैकी 20 जागांची पुनर्रचना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धीतने करण्यात आली आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागणार आहे. या संदर्भात उदाहरणच द्यायचे तर विरोधी पक्षनेता रवी राजा यांच्या प्रभागाचे देता येईल. जे तुम्हालाही ज्ञात आहे. परिणामी हा सर्व प्रकार लोकशाही प्रतिमेस तडा देणारा आहे.
ट्विट
Shri @milinddeora ji,
Received your letter addressed to CM Eknathrao Shinde and me on social media.
We have noted your sentiments & will definitely try to address your concerns for Mumbaikars and for free and fair elections.
Thanks !@mieknathshinde https://t.co/Vbnp5GIzCT
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 13, 2022
प्रभागांची संख्या 227 वरुन 226 करण्यापूर्वी नव्याने जनगणना करणे आवश्यक होते. तथापी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभआग पुनर्रचनेमध्ये 2011 सालच्या जनगणनेकडे दुर्लक्ष केले आहे. आपणास विनंती आहे की, प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण धोरणाला आपण त्वरीत रद्दबादल करावे आणि पारदर्शक पद्धतीने नवीन प्रभाग रचना करण्याकरिता एक स्वतंत्र समिती नेमणूक करावी अशी आमची विनंती आहे.
दवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल
मिलींद देवरा यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रार आणि पत्राची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देवरा यांच्या पत्राबद्दल फडणीस यांनी म्हटले आहे की, 'मिलिंद देवरा जी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मला लिहिलेले पत्र समाजमाध्यमातून प्राप्त झाले. आपण व्यक्त केलेल्या भावनांची योग्य दखल घेतली जाईल तसेच आपण मुंबईकर आणि निष्पक्ष निवडणुकांसंदर्भात जी अपेक्षा व्यक्त केली, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल!'. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूक 2022 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस, भाजप असा तिहेरी सामना शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर पाहायला मिळू शकतो.