Amit Thackeray In Shinde Cabinet: राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात स्थान? भाजपा आणखी एका धक्कातंत्राच्या तयारीत, शिवसेनेला शह देण्यासाठी खेळी?
Amit Thackeray | (Image source: Instagram)

राज्याच्या राजकारणात अनेक धक्के पाहायला मिळू शकतात. शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपच्या शिर्ष नेतृत्वाने एक धक्का दिलाच आहे. आता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचीही वर्णी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना (Shiv Sena) यांना धक्का देण्याासठी भाजप ही खेळी करण्याची शक्यता आहे. भाजपकडून मनसेला ही ऑफर दिल्याचे वृत्त आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी ही ऑफर धुडकावल्याचेही वृत्त आहे.

इकॉनॉमिक्स टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेवरील पकड कमी झाली आहे. त्यातच उद्धव ठाकरे कुटुंबाला असलेले महत्त्व कमी करण्यासाठी असे धक्कातंत्र राबवले जाण्याची शक्यता आहे. पाठीमागील काही वर्षांपासून पाहिले असता आदित्य ठाकरे हे शिवसेनेत प्रचंड सक्रीय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यानंतर ते शिवसेनेची सूत्रे हाती घेण्यासाठी सज्ज आहेत. मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना प्रामुख्याने आदित्य ठाकरे हेच पाहात असतात. आमदार आणि कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई कार्यक्षेत्र डोळ्यासमोर ठेऊन कामाचा जो धडाका लावला होता त्यावरुन त्यांच्या राजकारणाचे संकेत मिळत होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल निर्माण झालेले वलय पाहता त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजप ठाकरे विरुद्ध ठाकरे कार्ड खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (हेही वाचा, 'एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील कोणत्याही मंत्र्याला शपथ देऊ नये'; शिवसेनेचे राज्यपालांना पत्र )

दरम्यान, भाजप नेत्यांकडून मात्र आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिपदाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही. दुसऱ्या बाजूला या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगत हा दावा मनसे नेत्यांकडून फेटाळला जातो आहे. दोन्ही बाजूंकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. अमित ठाकरे हे सध्या मनसेच्या विद्यार्थी सेनेचे काम पाहतात.