BJP-Shiv Sena Battle For Power: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालानंतर भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) या दोन्ही मित्रपक्षांमध्ये सुरु झालेला सत्तासंघर्ष अत्युच्च टोकाला जाऊन पोहोचला आहे. आता हा संघर्ष एका विशिष्ट टप्प्यावर थांबणार की या संघर्षाची अखेर 'आमचं ठरलं' ते 'आमचं तुटलंय' इथपर्यंत जाऊन पोहोचणार याबाबत राजकीय वर्तुळाला उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतू, जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने दोन्ही पक्षांना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याखेरीज पर्याय नाही. त्यातच भाजपला सत्तेबाहेर ठेवणे हे आमचे प्रमुख ध्येय असेल असे काँग्रेस ( Congress) पक्षाने आगोदरच स्पष्ट केले आहे तर, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने जनमताचा कौल आपणास मान्य आहे. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाची भुमिका पार पाडू असे म्हटले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील सत्तासंघर्ष एका टोकाला जाऊन पोहोचला आहे. अशा स्थितीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, विधानसभा निडणुकीत भाजप स्वबळावर सत्ता स्थापण करु शकेन अशी भाजप नेतृत्वाला आत्मविश्वास होता. परंतू, जनमताचा कौल पाहता भाजपच्या आत्मविश्वासाला धक्का बसला. विधानसभा निवडणुकीत एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढत होता. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत होते. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 124 जागा लढवल्या. त्यापैकी भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 , काँग्रेस 44 आणि इतर पक्षांना 29 जागा मिळाल्या. त्यामुळे 145 हा बहुमताचा जादूई आकडा गाठायचा तर शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला गत्यंतर नाही. त्यामुळे भाजपच्या आत्मविश्वासाच्या फुग्याला जनतेनेच टाचणी लावल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, आमचं ठरलंच नव्हतं; पाचही वर्षं मुख्यमंत्री भाजपचाच: देवेंद्र फडणवीस)
दरम्यान, भाजप-शिवसेना सत्तावाटपात शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून राहिली आहे. तर, पुढील पाच वर्षे भाजपचाच मुख्यमंत्री राहीन असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करुन टाकले आहे. तत्पूर्वी, हा हरीयाणा नाही आणि इथे कोणी दुष्यंत चौटालाही नाही ज्याचा वडील तुरुंगात आहे, असे सांगत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, आम्हाला इतरही पर्याय खुला आहे. मात्र, आम्हाला ते पाप करायचे नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात भाजप आणि संजय राऊत यांच्या रुपात शिवसेना असा सामना रंगला असतानाच शिवसेनेचे 45 आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. काकडे यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ नसली तरी अनेकांच्या भुवया मात्र नक्कीच उंचावल्या आहेत.
दरम्यान, भाजप-शिवसेना संघर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आपण विरोधात बसण्याचा जनमताचा कौल स्वीकारल्याचे म्हटले आहे. मात्र, विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतानाच भाजप-शिवसेना दरी कशी रुंदावेल याबाबत दोन्ही पक्षाचे नेते दक्ष आहेत. काँग्रेसच्या सचीन सावंत यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचे प्रमुख ध्येय असेल असे म्हणत शिवसेनेला अप्रत्यक्ष चुचकारले आहे. तर, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने मात्र अद्याप शिवसेनेसोबत जाण्याचा आमचा मनोदय नाही, असे सांगत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. दरम्यान, युवक काँग्रेस सत्यजीत तांबे यांनी राजकारणात एकदा मिळालेली संधी पुन्हा मिळेलच असे काही नसते. त्यामुळे जे घ्यायचे ते आताच घ्या, असा सल्ला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना सत्तासंघर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी दुरुन मजा पाहात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.