बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय; भाजप नेत्याचा हल्लाबोल
Atul Bhatkhalkar & CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook & PTI)

सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र अद्याप परिस्थिती सुधारल्याचे दिसत नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "ऑक्सिजन नसल्यामुळे कंदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आले. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करते आहे."

Atul Bhatkhalkar Tweet:

(रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांचे प्रत्युत्तर)

दरम्यान, काल मुंबई पालिकेच्या सहा रुग्णालयातील 168 रुग्णांचे ऑक्सिजन अभावी दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार, सध्या ऑक्सिजनची सुविधा असलेल्या 1195 खाटा रिकाम्या आहेत. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई पालिकेसह राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. मात्र ते पश्चिम बंगाल निवडणूकीत व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही. यापूर्वी कोरोना संकटातील उपाययोजनांबाबत मागणीपत्र देखील मुख्यमंत्र्यांनी मोदींना लिहिले होते.