Pravin Darekar, Nawab Malik & Atul Bhatkhalkar (Photo Credits: Facebook)

राज्यातील कोरोनाची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir Injection) तुटवडा, काळाबाजार यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. हे इंजेक्शन मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या मेडिकलबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा आपण पाहिल्या आहेत. अशा परिस्थितीत भाजप कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप करण्यात येत असल्याचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले होते. नवाब मलिक यांच्या या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

"केंद्र सरकार, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर कमी वेळ घालवून सध्याच्या परिस्थिती आरोग्य सुविधांच्या नियोजनात आणि व्यवस्थेवर अधिक वेळ घालवावा. मोफत देणाऱ्यांचं कौतुक करा. ते त्यांच्या राज्यासाठी करत आहेत. राज्यातील व्यवस्था उभं करणं ही तुमची जबाबदारी आहे," असं प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. दरेकर यांनी ट्विटमध्ये लिहिले, "राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत! दुसऱ्याच्या ताटात काय वाढलंय, हे पाहण्यापेक्षा आपलं ताट रिकामं आहे! राज्यात आरोग्य व्यवस्थेत असलेल्या कमतरतेवर नवाब मलिक यांनी बोलावं!"

प्रवीण दरेकर ट्विट:

अतुल भातखळकर यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून मलिक यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. भाजप कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप झाल्यास राष्ट्रवादीचा संताप का होत आहे? दुसऱ्याच्या कामाचे कौतुक करा, असे भातखळकर यांनी म्हटले आहे. ते ट्विटमध्ये लिहितात, "रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय? सरकार म्हणून तुम्ही तोडपाणी शिवाय काहीच करत नाही, दुसरा काही काम करतोय त्याचे तरी कौतुक करा."

अतुल भातखळकर ट्विट:

"देशात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता असताना सूरत मधील भाजप कार्यालयात याचे मोफत वाटप होत आहे. हे काय कमी राजकारण आहे का?" असा सवाल नवाब मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला होता. त्याचबरोबर या ट्विटमध्ये त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना टॅग केले होतं. त्यावर भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.