महाराष्ट्रातील शहापूरनंतर पालघर येथे बर्ड फ्लूचा (Bird Flu) संसर्ग आढळला होता. आता मुंबईला लागून असलेल्या विरार (Virar) भागातही बर्ड फ्लूची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरारमधील अर्नाळा आणि बातार परिसरात कोंबड्या अचानक मरत होत्या. त्यानंतरच्या तपासणीत बर्ड फ्लूची पुष्टी झाली. आता प्रशासन याबाबत कारवाई करत आहे. या भागात आतापर्यंत 2300 कोंबड्या मारून पुरल्या गेल्या आहेत. अर्नाळा आणि बातर येथील 1 किलोमीटर परिसरात प्राणी विभागाने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. विरारमधील सर्व पोल्ट्री फार्म आणि चिकन शॉपमधून कोंबडी, अंडी जप्त करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एव्हियन इन्फ्लुएंझाचा रुग्ण आढळून आल्यानंतर काही दिवसांनी शेजारच्या पालघर जिल्ह्यातील वसई-विरार भागातील पोल्ट्री सेंटरच्या कोंबड्यांमध्येही संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी 'पीटीआय-भाषा'ला ही माहिती दिली. पालघरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत कांबळे यांनी सांगितले की, कुक्कुटपालन केंद्रातील (पोल्ट्री फार्म) काही कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
शुक्रवारी रात्री चाचणीचे निकाल आले ज्यामध्ये कोंबडीला H5N1 विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. मात्र कांबळे यांनी मात्र परिस्थिती गंभीर नसल्याचा दावा केला. पोल्ट्री फार्मच्या किती कोंबड्यांचा मृत्यू झाला हेही त्यांनी स्पष्ट केले नाही. अहवालानुसार, बर्डफ्लूमुळे शहापूर आणि वसई-विरारमध्ये तीन दिवसांत 31 हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या आहेत. याशिवाय संक्रमित क्षेत्रापासून 10 किमीचा परिसर सर्वेलंस क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. म्हणजेच या 10 किमी परिसरात कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित असेल. (हेही वाचा: Water Taxi Service in Mumbai: जाणून घ्या वॉटर टॅक्सी सुविधेचा मार्ग, भाडे, वेळेसह नियमाबद्दल अधिक)
या आठवड्याच्या सुरुवातीला ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील वेहोळेली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 100 पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर, जिल्हा प्रशासनाने एक किलोमीटरच्या परिघात असलेल्या कुक्कुटपालन केंद्रातील सुमारे 25,000 पक्षी मारण्याचे आदेश दिले होते.