Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2020) मत मोजणीला सुरुवात झाली असून राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या एडीए आणि महाआघाडी अटीतटीची लढत सुरु आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने अनेक मतदारसंघात आघाडी घेतली आहे. सुरूवातीच्या कलांवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तेजस्वी यादव यांचे राज्य येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. या निवडणुकीचा संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर लोक जंगल राज विसरलेले असतील आणि राज्यात मंगलराज सुरु झालेले असेल, अशी खात्री संजय राऊत यांनी दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की ”निकाल पूर्ण यायचे आहेत. जे कल पाहिले आहेत. त्यावरून एका तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आता अटीतटीची लढत आहे. मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल, तेव्हा लोक जंगल राज विसरलेले असतील आणि बिहारमध्ये मंगलराज सुरू झालेले असेल”, असे संजय राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Chandrakant Pati: पत्रकारांनी आक्षेप घेताच चंद्रकांत पाटील यांची सारवासारव म्हणाले ' गैरसमज नसावा'

बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा जागा आहेत. 243 जागांसाठी 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. त्या वेळी राजद-जदयू या पक्षांच्या महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या. आता विधानसभा निवडणूक 2020 मध्ये जनता काय कौल देते याबाबत उत्सुकता आहे.