Chandrakant Pati: पत्रकारांनी आक्षेप घेताच चंद्रकांत पाटील यांची सारवासारव म्हणाले ' गैरसमज नसावा'
Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Graduate Constituency Election 2020: पदवीधर मतदासंघातील उमेदवार तिकीट वाटपावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा आहे. यावर प्रसारमाध्यमांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) विचारे असता चंद्रकांत पाटील असे काही बोलून बसले की त्यावर पत्रकारांनी आक्षेप घेतला. पत्रकारांचा आक्षेप पाहताच चंद्रकांत पाटील यांनी लागलीच आपल्या विधानावर सरावासारव केली आणि त्यांनी 'मी चांगल्या अर्थानेच बोललो आहे, गैरसमज नसावा' असे म्हटले.

का घडले नेमके?

मराठवाड्यातून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. बोराळकर यांच्या उमेदवारीवरुन पंकजा नाराज असल्याचे वृत्त आहे. पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपमध्ये सामुदायिक पद्धतीने निर्णय घेतले जातात. एकाला न्याय द्यायचा तर चौघांवर अन्याय होणार. पण, पंकजा मुंडे नाराज नाहीत. कारखान्याचे काम असल्यामुळे त्या आज येऊ शकल्या नाहीत. हवे तर मी त्यांना फोन लाऊन देऊ काय? असेही पाटील या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Bigg Boss Marathi फेम अभिजित बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लढले, पडले; आता त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून लढायचे ठरवले)

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी प्रसारमाध्यमांना हात जोडून विनंती करतो. बातमी जशी आहे तशीच द्यावी. आपण जांबेकर यांचे वंशज आहात. चंद्रकांत पाटील यांनी असे म्हणताच पत्रकारांनी त्यावर लगेच आक्षेप घेतला. मग चंद्रकांत पाटील यांनी तातडीने सरवासारव करत म्हटले की, हे विधान मी चांगल्या अर्थाने म्हणजेच चांगले पत्रकार या अर्थाने केले आहे. तुम्ही त्यांची जयंती (दिन विशेष ) साजरी करता. त्यामुळे गैरसमज नसावा असे ते म्हणाले.

पदवीधर निवडणूक प्रचारासाठी चंद्रकांत पाटील औरंगाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी भाजपचे औरंगाबाद पदवीधर उमेदवार शिरीष बोराळकर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉ. भागवत कराड, प्रीतम मुंडे, हरिभाऊ बागडे, शहराध्यक्ष संजय केणेकर, आमदार अतुल सावे, संभाजीराव पाटील निलंगेकर, उपस्थित होते.