Bhaskar Jadhav, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत विरोधकांडे पुरेसे संख्याबळ आहे. विधान परिषदेत विरोधकांना विरोधीपक्षनेता देता आला आहे. पण, विधानसभा या कनिष्ठ सभागृहात मात्र तशी स्थिती नसल्याने विरोधी पक्षनेतेपद (Leader of Opposition) हे पूर्णपणे सरकारच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे. असे असले तरी, महाविकासआघाडीतून शिवसेना (UBT) पक्षाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचे नाव या पदासाठी जाहीर करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वत: हे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे या पदावरुन महाविकासआघाडीत कोणते सूत्र ठरले आहे का? राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. त्याबाबत ठाकरे यांना विचारले असता ठाकरे यांनी स्पष्टच उत्तर दिले आहे.

विरोधी पक्षनेतेपद अडीच अडीच वर्षे?

विधानसभेमध्ये विरोधकांकडे विरोधी पक्षनेता निवडता येईल इतके पुरेसे संख्यबळ नाही. त्यामुळे नियमानुसार विरोधीपक्षनेतेपदावर विरोधकांना दावा करता येत नाही. पण, लोकशाही मुल्ये टिकून राहावीत यासाठी राज्य सरकार विरोधी पक्षनेत्यास मान्यता देऊ शकते. त्यामुळे एका अर्थाने हे पद राज्य सरकारच्या कृपेवरच अवलंबून असणार आहे. पण, असे असले तरी ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा त्यास हे पद देण्याचे संकेत राज्य सरकारने देताच शिवसेना (UBT) पक्षाने या पदावर दावा केला. तसेच, भास्कर जाधव  आपले विरोधीपक्षनेते असतील असे जाहीरही केले. पण, त्यामुळे राजकीय वर्तुळात हे पद सेना आणि काँग्रेस अडीच अडीच वर्षे वाटून घेणार असल्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली. त्यावर पत्रकारांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच विचारले असता, ते म्हणाले असा कोणताही फॉर्मुला निश्चित झाला नाही. पण आम्ही सर्वजण एकत्रच काम करु, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले.आम्ही भास्कर जाधव यांचे नाव निश्चित केले आहे. विधानसभा अध्यक्षांनी ते अर्थसंकल्पापूर्वी जाहीर करावे आणि लोकशाही मुल्ये पाळावीत असेही ते म्हणाले. (हेही वाचा, LoP in Maharashtra Assembly: विधानसभा विरोधीपक्ष नेते पदी शिवसेना उबाठा च्या भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस; उद्धव ठाकरेंनी दिलं पत्र)

विधानसभेतील विरोधीपक्षाच्या आमदारांची एकूण संख्या विचारात घेता पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे: शिवसेना (UBT)- 20, राष्ट्रीय काँग्रेस- 16, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- 10. ही संख्या एकूण 46 इतकी होते आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसे संख्याबळ नाही. दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपद शिवसेनेला आणि विधानपरिषदेचे काँग्रेसला असा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात होते. मात्र, विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेतेपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पाहता मोठाच ट्विट्स पाहायला मिळाला. त्यामुळे आता दोन्ही सभागृहातील पदं ही शिवसेना (UBT) पक्षाकडे असणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.