मुंबई येथील ट्रॉम्बे येथे भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) नोकरी करणाऱ्या शास्त्रज्ञाने आत्महत्या केली आहे. ते 50 वर्षांचे होते. ही घटना सोमवारी (28 ऑगस्ट) रोजी घडली. मनीष सोमनाथ शर्मा असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते सन 2000 पासून BARC मध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. BARC च्या एका क्वार्टरमध्ये पत्नी नीतू यांच्यासोबत ते राहात होते. मनीष सोमनाथ शर्मा यांच्या आत्महत्येबद्दल ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतू शर्मा सोमवारी दुपारी 2:37 च्या सुमारास कामावरून घरी आल्या. घरात जाण्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळील स्पेअर चावी वापरली. घरात जाताच शर्मा हे हॉलच्या खोलीत पंख्याला नायलॉनच्या दोरीने लटकल्याचे दृश्य त्यांना पाहायला मिळाले.
घरातील दृश्य पाहून नीतू यांनी ताबडतोब मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक मारली. शेजारी आणि स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. शर्मा यांना जमिनीवर उतरवण्यात त्यांना यश आले. चेंबूरमधील अणुशक्ती कॉलनी येथे असलेल्या बीएआरसी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले, परंतु दुर्दैवाने शर्मा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.
शर्मा यांच्या निवासस्थानाची पाहणी केल्यावर, पोलिस आणि फॉरेन्सिक टीमला त्यांच्या हॉल रूमच्या टेबलावर हाताने लिहिलेले आत्महत्येबाबतचे पत्र सापडले. पत्रात "सॉरी बेटा" असे शब्द होते. नीतू यांनी पोलिसांना सांगितले की तिचा पती 2001 पासून नैराश्याने ग्रासला होता आणि BARC हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागात उपचार घेत होता. तो औषधोपचारही करत होता.
1998 मध्ये थर्मल इंजिनीअरिंगमधील स्पेशलायझेशनसह मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी पूर्ण केल्यावर, मनीष सप्टेंबर 2000 मध्ये BARC मध्ये रुजू झाले. त्यांनी प्रामुख्याने प्रगत अणुभट्ट्यांशी संबंधित सुरक्षितता अभ्यास, तसेच सुपरक्रिटिकल द्रवपदार्थांसह नैसर्गिक अभिसरण अभ्यासांवर काम केले. त्यांच्या कौशल्यामध्ये थर्मल हायड्रॉलिक डिझाइन आणि आण्विक अणुभट्ट्यांचे सुरक्षा विश्लेषण यांचा समावेश होता.
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी सापडलेली नायलॉन दोरी आणि हस्तलिखित सुसाईड नोट यासह साहित्य तपासणीसाठी फॉरेन्सिककडे पाठवण्यात येणार आहे. पोलिसांनी सध्यास्थितीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कारण घटनेमध्ये प्राथमिक तपासामध्ये तरी कोणत्यही प्रकारचे संशयास्पद काही वाटले नाही. मात्र, सखोल तपासात पुढील अनेक गोष्टी स्पष्ट होतील.