बारामती: गोपीचंद पडळकर यांच्या पराभवाची प्रमुख कारणे
Gopichand Padalkar | (Photo credit : Facebook)

आजवर खानापूर आटपाडी विधानसभा (Khanapur Atpadi Vidhan Sabha constituency) मतदारसंघातून राजकीय नशीब आजमावणारे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मोठ्या उत्साहाने बारामती विधानसभा (Baramati Vidhan Sabha Constituency) मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. सोबतच अजित पवार यांचा एक लाखांच्या मतांनी पराभव करावा, असे जाहीरही करुन टाकले. प्रत्यक्षात मात्र त्यांना केवळ 30 हजार 82 इतकीच मते मिळाली. गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले. पडळकरांना नामुष्कीजनक पराभवास सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे पडळकर यांची उमेदवारी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. त्यामुळे या लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. पडळकर यांच्या उमेदवारीसोबत त्यांच्या पराभवाचीही जोरदार चर्चा होत आहे. म्हणूनच गोपीचंद पडळकर यांच्या बारामतीमधील पराभवाचीही चर्चा होत आहे. या पराभवाची प्रमुख कारणे.

चुकीच्या मतदारसंघाची निवड

गोपीचंद पडळकर यांनी लढण्यासाठी चुकीच्या मतदारसंघाची निवड केली, असे अनेकांचे मत आहे. कारण, यापूर्वी गोपीचंद पडळकर हे कधीच त्या मतदारसंघातून लढले नव्हते. त्यामुळे त्यांचा या मतदारसंघात म्हणावा तसा लोकसंपर्क नव्हता.

पारंपरीक मतदारसंघ आणि अजित पवार यांची विकासकामं

बारामती हा अजित पवार यांचा पारंपरीक मतदारसंघ. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी या मतदारसंघातून विधानसभेवर नेतृत्व केले आहे. त्यामुळे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी या मतदारसंघात प्रचंड विकासकामे केली आहेत. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत बारामतीत जाऊन मैदान मारणे हे पडळकर यांच्यासाठी कठीण होते. (हेही वाचा, गळ्यात घड्याळ हातात कमळ, शिवसेनेच्या वाघाची व्यंगचित्रातून डरकाळी; संजय राऊत यांच्याकडून हटके ट्विट)

भाजपकडून कूमक मिळाली नाही

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. त्यासाठी महसूलमंत्री आणि भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष ठाण मांडून बारामती येथे थांबले होते. या वेळी भाजपकडून इथे विशेष अशी ताकद लावण्यात आली नाही. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात पडळकर हे प्रचारात आघाडी घेताना दिसत नव्हते.

शरद पवार यांच्यावरील प्रेम

बारामती मतदारसंघात धनगर समाजाची संख्या मोठी आहे. या समाजाकडे पाहून पडळकर यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली होती. मात्र, या मतदारसंघात शरद पवार यांचा विचार प्रमाण माणनारा जनसमुदाय प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. हा समुदाय सर्व समाजात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावरील लोकांचे प्रेम आणि भाजपचा प्रचार असा संघर्ष इथे पाहायला मिळाला. पण, शरद पवार यांच्यावरील प्रेम अजित पवार यांच्या मताधिक्याच्या रुपात पाहायला मिळाले.

उमेदवारीचे नेमके कारण स्पष्ट नाही

गोपीचंद पडळकर हे या मतदार संघातून लढत होते. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नेमका हाच मतदारसंघ का निवडला हे शेवटपर्यंत समजू शकले नाही. स्वत:चा खानापूर आटपाडी मतदारसंघ असताना आणि 2014 मध्ये या मतदारसंघातून त्यांना भाजपचे तिकीट मिळाले असतानाही पडळकर बारामतीत उतरले. खानापूर-आटपाडी मतदारसंघ हा युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे आहे. अनिल बाबर हे या मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. पण, पडळकर यांच्यावर भाजपचे इतकेच प्रेम होते तर त्यांच्यासाठी शिवसेनेकडून हा मतदारसंघ सोडवून घेताल आला असता. पण असे घडले नाही.

दरम्यान, विधानसभा निवडणूकीत भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 , काँग्रेस 44 आणि इतर पक्षांना 29 जागा मिळाल्या. या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला. भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा सहज जिंकू असे म्हणत होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही तसा दावा केला जात होता. पण, जनतेने भाजपच्या दाव्याला टाचणी लावली. जनतेने युतीला पुन्हा सत्ता दिली. मात्र, विरोधकांनाही प्रबळ बनवले.