पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना परदेशी विनिमय व्यवस्थापन म्हणजेच फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने समन्स जारी केले होते. या प्रकरणी आता अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. भोसले यांमनी शुक्रवारी ईडीने बजावलेल्या समन्स विरोधात मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली.
दरम्यान, शुक्रवार झालेल्या सुनावणीत ईडीने पुढील सुनावणीपर्यंत कोणताही कठोर कारवाई करणार नाही, असं तोंडी आश्वासन खंडपीठाला दिलं. त्यानंतर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. अविनाश भोसले यांची विदेशी चलन प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. (वाचा - ईडी लागली मागे, आता सीडी लावण्याचं काम बाकी- एकनाथ खडसे)
ईडीने अविनाश भोसले यांना समन्स बजावत त्यांच्या पुण्यातील अबिल हाउस कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर भोसले यांनी ईडीकडून आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची कोणतीही माहिती न देताचं कार्यालयात छापा टाकण्यात आला. त्यामुळे ईडीने याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी याचिकेतून केली. याशिवाय आपण चौकशीसाठी तयार असल्याचंही भोसले यांनी सांगितलं आहे.
मात्र, ईडीला सुनावणी सुरू असेपर्यंत कोणतीही कारवाई करण्यापासून रोखण्यात यावे आणि चौकशीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भोसले यांनी याचिकेतून केली आहे. 2017 मध्ये आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर ते चर्चेत आले होते.