धक्कादायक! बदलापूर येथे रागाच्या भरात मित्राच्या आईवर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

बलात्काराच्या (Rape Cases) घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या रोज येत आहेत. अशात मुंबईमधील बदलापूर (Badlapur) परिसरात एका युवकाने चक्क मित्राच्या आईवर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. आपली मुले कोणाच्या संगतीत आहेत, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांना चांगली संगत लाभावी यासाठी प्रत्येक पालक आपल्या पाल्याला बऱ्यावाईट गोष्टी सांगत असतात. मात्र यामुळेच बदलापूर येथील या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला. मित्राची आई मित्राला आपल्यासोबत राहू देत नाही  म्हणून दिनेश गोल्हे नावाच्या युवकाने चक्क मित्राच्या आईवरच बलात्कार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिमेच्या बॅरेज रोडवरील रमेशवाडी भागात हा प्रकार घडला आहे. दिनेश गोल्हे हा अट्टल दारुडा आहे. पिडीत महिलेचा मुलगा दिनेशचा मित्र असल्याने त्याच्या आईला आपल्या मुलाची चिंता होती. आपल्या मुलाला दारूचे व्यसन लागू नये म्हणून पिडीता आपल्या मुलाला दिनेशपासून लांब राहण्यास सांगत होती. हीच गोष्ट दिनेशला खटकली व त्याने याचा बदला घ्यायचे ठरवले. 12 डिसेंबर रोजी पीडित महिला घरी एकटीच होती, त्यावेळी दिनेश घरात घुसला व महिलेला जाब विचारात तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा: बलात्कार आणि खून प्रकरणी तब्बल 12 वर्षानंतर होणार पीडितेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम; 8 वर्ष तुरुंगवासानंतर निर्दोष सुटला होता आरोपी)

या गोष्टीला महिलेने विरोध केला असता त्याने थेट चाकूने तिच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार चुकवण्यासाठी महिलेने हात मधे केला असता, दिनेशने हातावर वार केले. त्यानंतर या महिलेने मदतीसाठी आरडओरडा केला. त्यावेळी सफाई कामगार आसमा मुल्ला यांनी जवळच्या लोकांना बोलावले. यादरम्यान दिनेशने तिथूम धूम ठोकली. ताबडतोब या घटनेची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनीही दिनेशला ताब्यात घेतले. न्यायालयाने दिनेशला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे महिलेला मानसिक धक्का बसला असून ती अजूनही त्यातून सावरली नाही.