दमदार प्रचार, सुमार कामगिरी; भाजपच्या निसटत्या विजयाची महत्त्वाची 5 कारणे
BJP Win | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Election Results 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मतमोजणी निकाल हळूहळू जाहीर होत आहेत. निकाल पाहून अनेकांना धक्का बसला. यात सर्वाधीक धक्का हा भारतीय जनता पक्षासाठी होता. विधानसभा निवडणुकीत 'अब की बार दो सौ पार' अशी जाहीर घोषणाही भाजप नेते करत होते. विधानसभा निकाल लागण्यापूर्वी भाजपने आपल्या पक्ष कार्यालयांमध्येही विजयाची जोरदार तयारी केली होती. प्रत्यक्षात मात्र 200 जागांचा आकडा गाठणे तर दूरच परंतू शंभरी हा तीन अंकी आकडा गाठतानाही भाजप मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळते. भाजप हा राज्यातील सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असला तरीही भाजपच्या या कामगिरीकडे सुमार कामगिरी म्हणूनच पाहिले जात आहे. भाजपच्या या यशाचे दमदार प्रचार, सुमार कामगीरी असे विश्लेषण राजकीय विश्लेषकांकडून केले जात आहे. भाजपच्या या कामगिरीस अनेक कारणे महत्त्वाची ठरली. या अनेक कारणांपैकी पाच महत्त्वाची कारणे.

कलम 370 मद्दा प्रभावी ठरला नाही

विधानसभा निवडणूक ही राज्याशी संबंधीत असतानाही भाजपने जम्मू काश्मीर आणि कलम 370 हा मुद्दा उपस्थित केला. भाजपने निवडणूक प्रचारात कलम 370 या मुद्द्यावर अधिक भर दिला. मात्र, राज्यातील ग्रामीण आणि शहरी जनतेला हा मुद्दा फारसा भावला नाही.

स्थानिक मुद्द्यांना बगल

भाजपने निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्द्यांऐवजी राष्ट्रीय मुद्द्यांना अधिक प्राधान्य दिले. यात राफेल, जम्मू काश्मीर, कलम 370 या मुद्द्यांवर अधिक भर दिला होता. यात स्थानिक प्रश्नांकडे भाजपचे पूर्ण दुर्लक्ष झाले. दुष्काळ, बेरोजगारी, शिक्षण, कर्जमाफी, पाणीटंचाई, महापूर या मुद्द्यांकडे भाजपने म्हणावे तसे लक्ष दिले नाही.

आयारामांना संधी

निवडणुकीच्या तोंडावर भाजपने विविध राजकीय पक्षातून अनेकांना आयात केले. विविध पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांना भाजप मेगाभरती असा टॅग मिळाला. त्यामुळे भाजपकडे सक्षम उमेदवार नाहीत. म्हणूनच भाजप इतर राजकीय पक्षांतून नेते आयात करत आहे, अशी भावाना जनमानसात बिंबवण्यात विरोधी पक्ष सक्षम ठरले. भाजपने केलेले आयारामांचे स्वागत जनतेला पटले नाही. तसेच, भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मनातही नाराजीची भावना निर्माण झाली. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव ओसरला? दमदार सभा झालेल्या ठिकाणी भाजप उमेदवार पराभूत)

बंडखोरी

शिवसेना भाजप युतीचे जागावाटप हेसुद्धा भाजपच्या कामगिरीवर परिणामकारक ठरले. कारण, भाजप शिवसेना युती लढवत असलेल्या ठिकाणी तब्बल 40 जागांवर बंडखोरी झाली. त्यामुळे बंडखोरीचाही फटका भाजप उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर बसला.

महापूर, कर्जमाफी

महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना बसली होती. त्यामुळे कर्जमाफीचा विषय शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा होता. दुसऱ्या बाजूला राज्यभरात पडलेला मुसळधार पाऊस त्यामुळे आलेला महापूर यामुळेही जनतेच्या मनात रोष होता. त्याचाही परीणाम भाजपच्या कामगिरीवर झाला.

शिवसेना-भाजप युती

राजकीय विश्लेषक आणि खुद्द भाजपच्या गोटातीलच काही मंडळींकडून मत व्यक्त करण्यात येत आहे की, शिवसेना भाजप युती झाल्याचा परीणाम भाजपच्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जर शिवसेना भाजप युती नसती तर बंडखोरी टाळता आली असती, तसेच जागाही वाढल्या असत्या असाही एक मत प्रवाह आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढत होता. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत होते. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत.