Maharashtra Monsoon Assembly Session 2021: तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्यासह 12 भाजपा आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन
Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला आहे. आज सकाळी 11 वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर ओबीसी आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांनी इम्पिरीकल डेटा केंद्राकडे मागण्यावरून ठराव मांडत असताना विरोधी पक्ष नेत्यांना बोलू न दिल्याने भाजपा आमदार संतापले आणि आवाजी मतदाना दरम्यान गोंधळ घातला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Presiding Officer Bhaskar Jadhav) यांच्यासोबत दालनात देखील हुज्जत घालत शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गिरिश महाजन, आशिष शेलार यांच्यासह 12 भाजपा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान आज तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव काम करत होते. सभागृहाचं काम सुरू असताना आरक्षणावरून सकाळपासूनच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडत होते. अशातच ओबीसी आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ अर्धसत्य सांगत असल्याचं म्हणत विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस संतापले होते. भास्कर जाधवांनी त्यांच्या जवळ आलेल्या भाजपा आमदारांना ताकीद दिली होती मात्र त्यांनी माईक हुसकावण्याचा, राजदंड पळवण्याचा प्रयत्न सभागृहात केला. नंतर दालनात भाजपा आमदार तावातावाने बोलत आई-बहिणीवरून शिव्या दिल्या असल्याची माहिती सभागृहात दिली आहे. यावेळी विरोधी पक्षनेत्यांना त्यांना आवरण्याचे आवाहनही झिडकारल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितले.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत झालेल्या या गैरवर्तनाचा सत्ताधारी पक्षांकडून निषेध करण्यात आला आहे. तर संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी या गोष्टीची दखल घेत भाजपा आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव पटलावर ठेवत वर्षभरासाठी निलंबन केलं आहे.

भाजपाचे 12 आमदार कोण?

डॉ. संजय कुटे, जामोद, जळगाव

आशिष शेलार, वांद्रे पश्चिम

अभिमन्यू पवार, औसा, लातूर

गिरीश महाजन, जामनेर, जळगाव

अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई

पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई

हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला

राम सातपुते, माळशिरस, सोलापूर

जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे

योगेश सागर, चारकोप, मुंबई

नारायण कुचे, बदनापूर, जालना

कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर

दरम्यान भाजपा आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर हा लोकशाहीचा खून आहे. विधिमंडळात विरोधकांचं संख्याबळ कमी करण्यासाठी हे केल्याचं सांगत विधानसभेतून भाजपाने वॉकआऊट केले आहे. दरम्यान निलंबित आमदारांना पुढील नागपूर आणि मुंबई अधिवेशनादरम्यान विधीमंडळात येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.