लेखन, प्रकाशन, संपादन अशा एकापेक्षा एक विविध क्षेत्रांमध्ये मुशाफीरी करणारे पद्मगंधा प्रकाशन (Padmagandha Prakashan) संस्थेचे अरुण जाखडे यांचे यांचे निधन (Arun Jakhade Passed Away) झाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने साहित्य आणि प्रकाशन क्षेत्राला धक्का बसला आहे. मेहता प्रकाशन संस्थेचे सुनील मेहता यांचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मराठी प्रकाशन विश्वाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. सुनील मेहता यांच्या निधनावर जाखडे (Arun Jakhade) यांनी शोक व्यक्त केला होता. तसेच, सुनील मेहता यांच्या शोकसभेत अरुण जाखडे यांनी भाषणही केले होते. त्यांना प्रकृतीचा त्रास होता मात्र त्यांची प्रकृती सामान्य होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.
पद्मगंधा प्रकाशन संस्था सुरु केल्यानंतर अरुण जाखडे यांना अनेक खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी पद्मगंधा प्रकाशन संस्थेचे काम नेटाने सुरु ठेवले. प्रामुख्याने त्यांनी मराठी भाषेला अनेक लेखक मिळवून दिले. इतकेच नव्हे तर अनेक लेखकही नावारुपाला आणले. गणेश देवी, रा. चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी यांच्यासारख्या अनेक नामवंत लेखकांची पुस्तके अरुण जाखडे यांनी पद्मगंधा प्रकाशनच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवली. (हेही वाचा, Sunil Mehta Passes Away: मेहता पब्लिशिंग कंपनीचे संचालक व ख्यातनाम प्रकाशक सुनील मेहता यांचे निधन)
अरुण जाखडे हे प्रकाशक होतेच. मात्र, ते स्वत: लेखकदेखील होते. त्यांनी दिवाळी अंक, भाषांतर, वृत्तपत्रीय लेखन अशा विविध लेखनप्रकारांमध्ये काम केले आहे. ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक जाखडे यांच्या संपादकीय निगराणीखाली पद्मगंधा प्रकाशित करत असे. ज्याला वाचकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असे. या अंकाच्या दर्जाबद्दल समीक्षक आणि वाचकांकडून नेहमी कौतुक होत असे.
अरुण जाखडे साहित्य संपदा
अरुण जाखडे यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. काही संपादितही केली आहेत. इर्जिक (स्तंभलेखनातील लेखांचा संग्रह), धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पाचरुट (कादंबरी), पावसाचे विज्ञान (बालसाहित्य), People’s Linguistic Survey of India-दुसरा भाग, The Languages of Maharashtra – १७वा खंड (इंग्रजी, सहलेखक : गणेश देवी), प्रयोगशाळेत काम कसे करावे, भारताचा स्वातंत्र्यलढा, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण, विश्वरूपी रबर, शोधवेडाच्या कथा, हुसेनभाई बाताड्या (कादंबरी) यांसारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहीली.