कला दिग्दर्शक राजू साप्ते यांची आत्महत्या; मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला 'हा' इशारा (Watch Video)
Ameya Khopkar | (File Image)

मराठी सिनेमा आणि मालिका क्षेत्रातील कला दिग्दर्शक राजू साप्ते (Raju Sapte) यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्यात त्यांनी आपली बाजू मांडत राकेश मौर्य यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. तसंच यापुढे जरी कोणी मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हातपाय तोडून गळ्यात बांधू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

अमेय खोपकर व्हिडिओच्या माध्यमातून म्हणाले की, "मराठी मालिका, सिनेमा क्षेत्रात काम करणारे कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हिडिओ सध्या महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी राकेश मौर्य यांनी त्रास दिल्याचे म्हटले आहे. राकेश मौर्य हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. याची दादागिरी ही अनेक वर्ष या क्षेत्रात आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला अनेकदा बडवला आहे. मात्र त्याला कोणाचा पाठिंबा आहे, मला माहित नाही. त्या फालतू राजकारणात मला आता जायचे नाही. पण राकेश मौर्य यांच्या युनियनच्या प्रत्येक निर्मात्याला त्रास होत आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. एक म्हणजे कोणत्याही युनियनला सिनेमाच्या सेटवर जाण्याची हायकोर्टाकडून परवानगी नाही. कोणीही सेटवर जाऊन शूटिंग थांबवू शकत नाही. महाराष्ट्रात काम करताना कोणी कोणाला रोखू शकत नाही."

या क्षणापासून मराठी निर्मात्यांना त्रास देऊन शूटिंग बंद करण्याचा प्रयत्न केला तर ताबडतोब मनसेच्या जवळच्या शाखेला फोन करा. मला संपर्क करा. तिथे सेटवर आमची माणसं येतील आणि तुमचं शूटिंग पुन्हा सुरु होईल. राजू साप्ते हा अत्यंत प्रामाणिक. चांगला माणूस होता. मी त्यांच्यासोबत काम केलं असून आतापर्यंत त्यांनी कधीच कोणाचाही एक रुपया थकवला नाही. तरी देखील राकेश मौर्य हे राजू साप्ते यांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत आहेत. याप्रकरणात निर्माते नितीन वैद्य यांनी देखील मधस्थी केली होती. तरीही मौर्य यांनी ऐकले नाही.

अमेय खोपकर व्हिडिओ:

पुढे ते म्हणाले की, "याप्रकरणात पूर्वीच मनसेला संपर्क केला असता तर मी खात्री देतो, साप्ते यांच्या कुटुंबियांना आजचा दिवस पाहावा लागला नसता. यापुढे जर राठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हातपाय तोडून गळ्यात बांधू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे." ('आम्ही मराठी तुला लवकरच थोबडवणार', मनसे नेते अमेय खोपकर यांचा बिगबॉस स्पर्धकाला याला इशारा)

तसंच यापुढे कोणीही जर मानसिक त्रास दिल्यास, पैशांसाठी तगादा लावल्यास, शूटिंग बंद केल्यास मनसे कार्यकर्त्यांना संपर्क करण्याचे आवाहन खोपकर यांनी केले आहे. त्याचबरोबर राजेश मौर्य याला ताबडतोब अटक करुन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पत्र लिहिणार आहेत.

माझे सर्व सहकारी या क्षेत्रातील लोकांसाठी अडीअडचणीला उभे राहतात, याचा मला अभिमान असल्याचेही ते म्हणाले. राजू साप्ते यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत लवकरच त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. तसंच मनोरंजन क्षेत्रातील सर्वांसाठी मी कायम उभा आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.