एन्काऊंटर स्पेशालिस्ट (Encounter Specialist) प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या घरी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (NIA ) ने आज (17 जून) छापेमारी केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटीलिया (Antilia Explosives Case) बाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली गाडी उभा करण्यात आली होती. त्यानंतर अल्पावधीतच मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाला. या सर्व प्रकारणाचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातून नुकताच बडतर्फ करण्यात आलेला अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याला अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्याबाबत एनआएला काही धागेदोरे मिळाल्याची चर्चा आहे. या धाग्यादोऱ्यांवरुनच एनआयएने सकाळी सहा वाजलेपासून प्रदीप शर्मा यांच्या घरी छापा टाकत तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एनआयएच्या एका पथकाने अत्यंत गोफनियता बाळगत प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. प्रदीप शर्मा राहात असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना केंद्रीय राखीवर पोलीस दलाचे (Central Reserve Police Force) जवानही या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, उलटसुलट चर्चाही केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी प्रदीप शर्मा राहतात तो अंधेरी येथील अत्यंत उच्चभ्रू परीसर म्हणून ओळखला जातो. (हेही वाचा, Sachin Vaze Dismissed: सचिन वाझे बडतर्फ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे आदेश )
एएनआय ट्विट
Mumbai: NIA conducts raid at the residence of Shiv Sena leader and former 'encounter specialist' of Mumbai Police, Pradeep Sharma. Details awaited.#Maharashtra pic.twitter.com/s6dO1WMh6T
— ANI (@ANI) June 17, 2021
दरम्यान, प्रदीप शर्मा यांची मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन वेळा चौकशी झाली आहे. ही चौकशी सलग दोन दिवस करण्यात आली होती. चौकशीदरम्यान एनआयएने शर्मा यांचा मोबाईलही ताब्यात घेतल्याचे सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले होते. एनआयएने या प्रकरमात संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना नुकतीच अटक केली होती. संतोष शेलार हा व्यक्ती प्रदीप शर्मा यांच्या अत्यंत जवळचा असल्याचे सांगितले जाते. तर, विनायक शिंदे आणि सचिन वाझे यांच्यात अंधेरी येथे एक बैठक झाली होती या बैठकीला माजी पोलीस अधिकारी उपस्थित असल्याची जोरदार चर्चा होती.