Anant Ambani , Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याची राजधानी मुंबईमध्ये काल सायंकाळी दोन वेगवेगळ्या परंतू महत्त्वपूर्ण घटना घडल्या. एकीकडे मनसे दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले. दुसऱ्या बाजूला उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनंत अंबानी यांच्यात सुमारे तीन तार चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आला नाही.

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता काहीच दिवसांमध्ये अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या रुपात शिवसेनेला इतका मोठा धक्का बसला असताना देशातील पहिल्या फळीतील उद्योगपतींनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेणे हे सूचक मानले जात आहे. (हेही वाचा, MNS Deepotsav 2022: मनसे दीपोत्सव कार्यक्रमात CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे शिवाजी पार्क येथे एकत्र; राजकीय वर्तुळात नव्या युतीची चर्चा)

उद्धव ठाकरे आणि अंबानी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी याबाबत राजकीय आणि औद्योगीक वर्तुळातही तर्कवितर्क लढवले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे रात्री 8.30 वाजता भेटीदरम्यान सुरु झालेली बैठक रात्री जवळपास 11.30 पर्यंत चालली. जवळपास तीन तास चर्चा केल्यानंतर अनंत अंबानी हे मातोश्रीवरुन 11.30 च्या सुमारास बाहेर पडले.