'गोरखपूरच्या सरकारी इस्पितळात प्राणवायूअभावी शंभर बालके दगावली ही मनुष्यचूक तशीच अमृतसरचा रेल्वे अपघात ही मनुष्यचूक आहे. रेल्वेने लोकांना चिरडले. त्या रेल्वेगाडीच्या चालकाचा तरी दोष काय? असे अपघात यापूर्वी झाले व यापुढेही होतील, पण सत्ताधारी मात्र बुलेट ट्रेनच्या धुंदीत जगत असतात. त्याच धुंदीचे हे बळी आहेत', अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंजाबमधील अमृतसर रेल्वे अपघातानंतर सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, 'अमृतसरच्या रेल्वे रुळांवर जे घडले, त्या रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या करुण किंकाळ्याच होत्या', असेही ठाकरे यांनी म्हटले आहे..
'आमच्या देशात महागाईचा भडका उडाला आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया महाग झाला, पेट्रोल-डिझेल महाग झाले, पण सामान्य जनतेचे मरण मात्र स्वस्त झाले आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा भयंकर प्रकार पंजाबात घडला आहे. जालियनवाला बाग इंग्रज राजवटीत घडले, अमृतसरचे हत्याकांड स्वराज्यात घडले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवूनही किड्यामुंग्यांसारखे मरण जनतेच्या नशिबी कायम आहे. माणसे शेतावर मरत आहेत. रस्त्यांवरील अपघात, रेल्वे अपघात तर जनतेच्या पाचवीलाच पुजले आहेत. विकास आणि प्रगतीच्या गोष्टी आम्ही करतो, पण रेल्वे यंत्रणा साफ भंगारात गेली आहे. सिग्नल यंत्रणा, तडे गेलेले रूळ, वेळापत्रक सुविधा यांची बोंब असताना राज्यकर्ते ‘बुलेट ट्रेन’च्या नावाने दांडिया खेळतात याचे आश्चर्य वाटतेट, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये ' रक्ताळलेले ‘अच्छे दिन’ अमृतसरचे रेल्वे हत्याकांड!' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. (दसऱ्याच्या मुहूर्तावर मृत्यूचे तांडव : रेल्वेने चिरडून तब्बल 60 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी)
'प्रश्न फक्त मुंबई उपनगरीय रेल्वेचा नाही, तर बेफिकीर रेल्वे मंत्रालयाचा आहे. संरक्षण खात्याचे मंत्री असोत नाहीतर रेल्वे खात्याचे, ते खरोखरच गांभीर्याने त्यांचे खाते सांभाळत आहेत काय? कुणाला कुठेतरी कामधंद्याला चिकटवून टाकायचे अशा पद्धतीने महत्त्वाच्या खात्यांवर मंत्री म्हणून लोकांना चिकटवले आहे. त्यांचा सारा वेळ पक्षाची वकिली करण्यातच जातो. एखादा मोठा रेल्वे अपघात होतो, त्यानंतर रेल्वेमंत्री राजीनामा देऊन दुसऱ्या खात्यात बदलून जातो. हे परंपरेने चालले आहे. सुरेश प्रभू गेले, त्यांच्या जागी पीयूष गोयल आले. रेल्वेची सेवा सुरक्षित व शिस्तीत होईल असे सांगितले, पण कालचा गोंधळ बरा होता असे वाटावे इतकी परिस्थिती बिघडली. रेल्वे मंत्रालयाचे एक स्वतंत्र बजेट होते. मोदी सरकारने तेही काढून टाकले. श्रीमान गोयल नामक रेल्वेमंत्री हे कागदावर आहेत, पण रेल्वे रुळांवर आहे काय? ती लोकांना चिरडत आणि लटकवत निघाली आहे. मंत्र्यांचे होमवर्क कच्चे असते व कच्चे मंत्री फक्त धुरळा उडवतात. त्या धुरळ्यात असे अपघात घडतात', असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.