दसऱ्याच्या मुहूर्तावर मृत्यूचे तांडव : रेल्वेने चिरडून तब्बल 60 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी
अमृतसर रेल्वे अपघात (Photo Credits: ANI)

दसऱ्याच्या मुहूर्तावर पंजाबच्या अमृतसर येथे मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. रावण दहन पाहत असलेल्या तब्बल 60 पेक्षा जास्त लोकांवर काळ बनून आलेल्या रेल्वेने घाला घातला. या अपघातातील मृतांची संख्या ही 70 पर्यंत पोहचली असून 50 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. अवघ्या 5 सेकंदात 60 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे पाहून अवघा देश हळहळला आहे.

पंजाबातील अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटकाजवळ ‘रावण दहना’चा कार्यक्रम चालला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरात तोबा गर्दी जमली होती. यातीलच काही लोक रेल्वेच्या रुळावरदेखील उभे राहून या दहनाची दृश्ये पाहत होती. या कार्यक्रमावेळी फटाक्यांची आतिषबाजीदेखील करण्यात येत होती. रावणाचा पुतळा खाली कोसळल्यानंतर लोक इकडे तिकडे सैरावैरा धावू लागले. यातीलच काही लोक रेल्वे लोहमार्गावर आले. याच वेळी पठाणकोटहून अमृतसरच्या दिशेने धावणारी एक्स्प्रेस मार्गावर दाखल झाली आणि बघता बघता लोहमार्गावरील लोकांना चिरडून या रेल्वेने 60 पेक्षा जास्त लोकांचे प्राण घेतले.

या अपघाताने अवघा देश सुन्न झाला आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी रात्रीच घटनास्थळी पोहोचून अधिकाऱ्यांकडून या अपघाताची माहिती घेतली. मात्र रेल्वेने या अपघाताची जबाबदारी झटकत मनोज सिन्हा यांनी स्थानिक प्रशासनाने रेल्वे बंद ठेवण्यासाठी कुठलीही माहिती दिली नव्हती, तसेच रेल्वे ट्रॅकवर उभे असलेल्या लोकांनी कार्यक्रमातील आतषबाजीमुळे रेल्वेचा आवाज ऐकला नाही असे म्हटले आहे. विशेष म्हणजे मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे प्रवासी नव्हते, असे सांगत ‘घुसखोर’ म्हणून रेल्वेने त्यांची नोंद केली आहे. त्यामुळेच रेल्वेकडून या मृतांना कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. रेल्वेमंत्री पियूष गोयल हे अमेरिका दौऱ्यावर असून दौरा थांबवून ते मायदेशी परतत आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या मंत्री नवज्योत कौर या दहन कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी होत्या, यांनी दुर्घटनेला रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भाजप यावरुन राजकारण करत आहे. मात्र, ही वेळ राजकारण करण्याची नसून जखमींना योग्य ती मदत करण्याची आहे, असेही नवज्योत कौर म्हणाल्या.

या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. तर याबाबत राजकीय आरोपप्रत्योरापही होत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मदतीची घोषणा केली आहे. पण या दुर्घटनने वेगवेगळ्या विभागाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. या दुर्घटनेचा अहवाल समोर आल्यानंतर सत्य समोर येईल. मात्र, या अपघाताबाबत प्राथमिक विचार करता अनेक प्रश्न आणि चुका समोर आल्या आहेत. जर या चुका टाळल्या असत्या तर 60 निर्दोष लोकांचे जीव वाचले असते