Amol Kolhe meets Ajit Pawar: कोल्हे सांगा कोणाचे? अजित पवार यांच्या भेटीमुळे उलटसुलट चर्चा
Amol Kolhe (PC - Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) कोणाचे? शरद पवार की अजित पवा गटाचे? हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडापासून उपस्थित केला जातो आहे. आजही हा प्रश्न कायम असून त्यातील गुंता सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतोच आहे. अमोल कोल्हे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची आज त्यांच्या दालनात भेट घेतल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाने नुकतीच शरद पवार (Sharad Pawar) गटातील खासदारांना अपात्र करावे अशी मागणी राज्यसभा आणि लोकसभा सभापती, अध्यक्षांकडे एका पत्राद्वारे केली आहे. ज्यामध्ये अमोल कोल्हे यांचे नाव नाही. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

अजित पवार यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भाजपसोबत हातमिळवणी करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही प्रमुख नेते आणि बहुसंख्य आमदार उपस्थित होते. या आमदारांसोबत उपस्थित असलेल्या खासदारांमध्ये डॉ. अमोल कोल्हे हे सुद्धा होते. इतकेच नव्हे तर अजित पवार गटाला आपला पाठिंबा असल्याचे पत्रही त्यांनी अजित पवार गटाला दिले आहे. या गटाने तसा दावाही आयोगाकडे केला आहे. पण मजेशीर बाब अशी की, याच कोल्हे यांनी शरद पवार गटालाही आपल्या समर्थनाचे पत्र दिले आहे. इतकेच नव्हे तर ते उघडपणे शरद पवार यांच्यासोबतही दिसले आहेत. त्यामुळे कोल्हे नेमके कोणाचे? याबाबत लोकांमध्येसंभ्रम आहे.

दरम्यान, अजित पवार गटाने शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करा अशी मागणी करणारे एक पत्र राज्यसभा सभापती आणि लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, या पत्रात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांची नावे नाहीत. ही नावे वगळता लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील, राज्यसभेतील खासतार वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांची नावे मात्र अपात्रतेची मागणी करणाऱ्या यादीत आहेत. त्यामुळे सडेतोड असलेल्या अजित पवार यांनी अशी निवडक भूमिका का घेतली याबाबत आश्चर्य व्यक्त होते आहे.

शरद पवार गटाने अजित पवार गटातील खासदार प्रफुल्ल पटेल यांना निलंबीत करावे यासाठी राज्यसभा सभापतींकडे पत्र दिले होते. या पत्रानंतर अजित पवार गटानेही शरद पवार गटातील खासदारांना निलंबी करण्यासाठी पत्र दिले. मात्र, केवळ मतदार आणि जनतेची सहानुभूती मिळू नये या कारणासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावे वगळली का? अशी चर्चा आहे. तसेच, अमोल कोल्हे नेमके कोणत्या गटाचे याबाबतही निश्चितता नसल्याने त्यांचे नाव पत्रात घेतले नसावे, असेही बोलले जात आहे.