Sharad Pawar | (File Image)

Sharad Pawar On Maratha Reservation: कुणबी की मराठा? सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या जात प्रमाणपत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट आणि सडेतोड भाष्य केले आहे. जन्माने दिलेली जात आपण लपवत नाही. तसेच, माझी जात सगळ्या जगाला माहिती आहे, असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. पवार कुटुंबीयांनी दिवाळी पाडवा (Diwali Padwa) परंपरेनुसार साजरा केला. या वेळी गोविंदबाग येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेते (Sharad Pawar PC) ते बोलत होते. या वेळी त्यांनी जात प्रमाणपत्र, मराठा आरक्षण, राज्यातील राजकीय स्थिती आणि इतरही काही महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.

पवार कुटुंबीय पाठीमागील जवळपास 50 वर्षांपासून बारामती येथे दिवाळी पाडवा साजरा करता. या वेळी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांचे हितचिंतकसुद्धा बारामती येथे येतात. ते पवारांना शुभेच्छा देतात. पवारही आपल्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आशीर्वाद आणि शुभकामना देतात. विशेष म्हणजे काही काळापासून केवळ बारामती येथे फक्त बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून लोक येतात. यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातील नागरिकांचाही समावेश असतात. या वर्षी पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये 70% लोक हे तरुण होते. यावरुनच लक्षात येते की, शरद पवार यांना तरुणांचा मोठा पाठींबा मिळत आहे.

दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना ते म्हणाले राज्यात मराठा आरक्षण मुद्दा गंभीर आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण करणार आहोत. मराठा आणि ओबीसी समाजात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. मात्र, काही लोक मात्र तो वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांचे न्याय्य प्रश्न सुटायला हवेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला सर्वपक्षीय लोक उपस्थित होते. या वेळी आरक्षणाच्या प्रक्रियेची पूर्तता करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे पवार यांनी सांगिले.

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा व्हायरल झालेला जातीचा खोटा दाखला चर्चेचा विषय ठरला होता. याबाबत विचारले असता ते म्हणाले, माझा जातीचा उल्लेख असलेला बोगस दाखला व्हायरल झाला होता. मी जन्माने मिळालेली जात लपवत नाही. माझी जात जगाला माहिती आहे. दरम्यान, मुंब्रा येथील शिवसेना (UBT) पक्षाची शाखा पाडल्याच्या घटनेबाबत विचारले असता, शाखा पाडणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.