NCP Chief Sharad Pawar (File Photo)

सध्या सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जातीचा दाखला व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शरद पवारांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा केला जात आहे. पंरतू जर तुम्ही यावर विश्वास ठेवला असाल तर एकदा ही बातमी नक्कीच वाचा. या व्हायरल मॅसेजवर शरद पवार समर्थक विकास पासलकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित जातीचा दाखला खोटा असल्याचा दावा पासलकर यांनी केला. शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं नसल्याचंही पासलकर यांनी सांगितलं. यामुळे नागरिकांनी देखील यावर विश्वास ठेऊ नये असे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा -Sharad Pawar Feels Unwell: बारामतीत बैठकीदरम्यान शरद पवारांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला; पुणे जिल्ह्याचा दौरा रद्द)

या व्हायरल मॅसेजवर विकास पासलकर म्हणाले, “एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय. हे षडयंत्र अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रातील जे षडयंत्रकारी लोक आहेत, त्यांना कुठून तरी रसद पुरवली जात आहे. शरद पवारांचं बारामतीमध्ये शिक्षण झालं आहे, याचा धडधडीत पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे हे सर्व षडयंत्राचा भाग आहे.”

या विषयावर आणखी म्हणताना पासलकर म्हणाले की  “मागील कित्येक वर्षांपासून शरद पवारांविरोधात षडयंत्र सुरू आहे. परंतु जेव्हा सामाजिक विषय असतो. तेव्हा आम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशा विषयांमध्ये खोलात जावं लागतं. एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी व्हिटामिन कुठून पुरवलं जातंय, हे शोधणं गरजेचं आहे, हे सगळं नागपूर सेंटरकडून घडत आहे,” असा दावा पासलकर यांनी केला.