राज्यातील ग्रामसभांना 31 मार्च पर्यंत स्थगिती
Gram Panchayat | (File Image)

कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांना देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती देण्यात आली आहे. चारहून अधिक ग्रामपंचायतींची जबाबदारी एका अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याने एकाच वेळी सर्व ग्रामसभांना उपस्थित राहणे शक्य होणार नाही. यामुळेच मार्च अखेरपर्यंत ग्रामसभांना स्धगिती देण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णय आजच्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत होणार आहे. (Maharashtra Gram Panchayat Elections 2021: राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 गावांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 79% मतदान)

राज्यातील 14 हजारहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे निकाल अवघ्या दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाले. परंतु, सरपंच आरक्षण सोडत होणे बाकी आहे. त्यानंतर नवे सरपंच पदभार स्वीकारतील आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडतील. दरम्यान, चार ते आठ ग्रापंचायतींची जबाबदारी एका प्रशासकाकडे सोपण्यात आली आहे. त्यामुळे एका प्रशासकालाला गावातील सर्वच कामकाज पाहणे आणि सभा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे ग्रामसभांना स्थगिती देण्यात आली आहे.

एका वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे ही सरपंच, ग्रामसेवकाची जबाबदारी असते. 26 जानेवारी रोजी ग्रामसभेत अर्थसंकल्प सादर करुन त्यास मंजुरी दिली जाते. परंतु, यंदा ग्रामसभांवर स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, सबळ कारण नसतानाही सरपंच ग्रामसभेसाठी उपस्थित न राहिल्यास ते अपात्र ठरतात आणि ग्रामसभा घेण्यात ग्रामसेवक दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते.

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी नुकत्याच निवडणूका पार पडून 18 जानेवारी रोजी निवडणुकांचे निकाल हाती आले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती.