अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. या मुहूर्ताचं औचित्य साधत मोठ्या प्रमाण विवाह पार पडतात. पण या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये सार्या सरपंच, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेवकांनी दक्ष राहून आपल्या गावात बालविवाह (Child Marriage) होणार नाहीत याची काळजी आणि खबरदारी घ्यावी असा आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. तसे झाल्यास संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये 2006 पासून बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आलेला आहे. कायद्यानुसार बालविवाह आयोजित करणं हा अजामीनपात्र गुन्हा आहे. मागील 2-3 वर्षांत कोविड 19 संकट, लॉकडाऊन, ऑनलाईन शाळा, बेरोजगारी यामुळे बालविवाह वाढल्याचे दिसून आलं होतं. या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकार्यांनी थेट आदेशच काढत त्याविरूद्ध सजगता दाखवली आहे.
बालविवाह ही प्रथा बाल हक्काच्या विरोधी आहे. तसेच हे विवाह बेकायदेशीर देखील आहेत. या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. तसेच अशा गुन्ह्यात 1 लाख रुपये दंड व 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. Maharashtra: बालविवाहाच्या घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या वृत्ताची गंभीर दखल घेण्याचे MSHRC चे राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश.
कुठेही बालविवाहाबाबतची घटना घडत असल्याचे दिसताच, त्वरित जवळचे पोलिस ठाण्यातील बाल कल्याण पोलिस अधिकारी, सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बाल कल्याण समिती, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, चाइल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच चाईल्ड लाईन हेल्पलाइन टोल फ्री नंबर 1098 किंवा पोलिस हेल्पलाइन नंबर 112 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देता येऊ शकते.