Akot Taluka Panchayat Samiti: ईश्वरचिठ्ठी लाभली! शिवसेना विजयी, काँग्रेस बरोबरीत पराभूत; अकोट तालुका पंचायत समिती निवडणुकीत विचित्र निकाल
Congress-Shiv Sena | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

निवडणूक म्हणजे जनमत आणि निवडणूक निकाल म्हणजे जनमताचा कौल. उमेदवाराचे भवितव्यच त्यावर ठरते. पण कधी कधी जनता अशी काही निर्णय देते की मोठाच प्रेच निर्माण होतो. अकोला जिल्ह्यातील अकोट तालूका पंचायत समिती निवडणूक निकालावेळी (Akot Taluka Panchayat Samiti Election Results) याचाच प्रत्यय आला. अकोटमध्ये अकोलखेड पंचायत समिती गणात शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस (Congress) पक्षाच्या उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामुळे पेच निर्माण झाला. जो चार वर्षांच्या मुलीने ईश्वरचिठ्ठी (Lucky Draw) काढून सोडवला. अगदीच अपवादाने घडणाऱ्या या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

घडले असे की, या गणात काँग्रेस आणि शिवसेना उमेदवार आमनेसामने होते. दोघांमध्ये तुल्यबळ लढत झाली आणि दोघांनाही समान मते मिळाली. काँग्रेसकडून दिगंबर पिंप्राळे आणि शिवसेना पक्षाकडून सूरज गणभोज हे रिंगणात होते. मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच दोघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत होती. ही टक्कर इतकी घासून होती की दोघांमध्ये एकदोन मतांचाच फरक होत होता. दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये क्षणाक्षणाला उत्सुकता वाढत होती. अखेर तो क्षण आला. निकाल जाहीर होणार म्हणून दोन्ही बाजूचे समर्थक कानात प्राण आणून उत्सुकतेने वाट पाहू लागले. पण निकाल आलाच नाही पुढे आले भलतेच वास्तव. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना समानच मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निकाल लागलाच नाही.

दोघांनाही समान मते मिळाल्याने विजयी कोणाला ठरवायचे हा प्रश्न होता. अखेर ईश्वरचिठ्ठी काढण्याचे ठरले. चार वर्षाच्या मुलीला बोलावण्यात आले. तिच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात शिवसेनेचे सूरज गणभोज यांचे नाव आले. ईश्वरचिठ्ठीद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सूरज गणभोज यांना विजयी घोषीत करण्यात आले. (हेही वचा, Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, ठळक घडामोडी)

दरम्यान, राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळे हीच आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, राज्यात महाविकासआघाडी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र वेगळे लढण्याचा निर्णय आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. त्यामुळे काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर सामना पाहायला मिळत आहे. राज्यातील या हटके अशा समिकरणाला जनता कशी दाद देते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.