लस घेतली म्हणजे आपण कोरोनामुक्त झालो अशा संभ्रमात गाफील राहू नका, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. लसीमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्यास 3-4 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे लस मिळाल्यानंतरही सोशल डिस्टनसिंग आणि मास्क घालणे अनिवार्य असणार आहे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान आज राज्यातील पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरस वरील लसीची ड्राय रन सुरु आहे. राजेश टोपे यांनी जालना येथील आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या ड्राय रनची पाहाणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत जशी व्यवस्था असते तशीच लसीकरण केंद्रावर असणार आहे. एक बुथ असेल तिथे तीन रुम्स असतील. प्रत्येक बुथवर 6 कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. सर्वप्रथम पोलिस तुमचे ओळखपत्र तपासतील. त्यानंतर आयडेंटिफिकेशन रुममध्ये एसएमएस आलेली व्यक्तीच लस घेण्यासाठी आली आहे का, याची खात्री CoWIN अॅपद्वारे केली जाईल. त्यानंतर इंजेक्शन रुममध्ये लस दिली जाईल. त्यापुढील लस घेण्याची तारीख एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. तिसरी observation room असेल. त्या ठिकाणी लस दिलेल्या व्यक्तीला 30 मिनिटं निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.
तसंच लस मिळाल्यानंतर व्यक्तीने पुढील 3-4 महिने काय काळजी घ्यावी, कसे वागावे, याची माहिती देखील लसीकरण केंद्रावर दिली जाईल. साधारणपणे एका केंद्रावर 100 व्यक्तींना लस देण्यात येईल. त्यामुळे या संपूर्ण वर्षभरात लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु राहील, हे ही त्यांनी स्पष्ट केले. (COVID-19 Vaccination in India: कोविड 19 लस भारत भर मोफत उपलब्ध असणार; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन)
विशेष म्हणजे लस उपलब्धता हा प्रश्न नाही. केवळ लसीला मंजूरी मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर लसीकरण सुरु करता येईल, असे सांगत त्यांनी राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, देशातील सर्वांना कोविड-19 लस मोफत मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे.