Uddhav Thackeray Visits Marathwada: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौऱ्यात सभा घेतली आणि ढिम्म असलेल्या प्रशासनातील सूत्रे वेगाने हालली. मराठवाडा दौऱ्यात बीड येथील जाहीर सभेत (Beed rally) ठाकरे यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीचा पंचनामा केला. त्यांनी धारुर तालुक्यातील अंजनडोह येथील शेतकऱ्यालाच भाषणावेळी पाचारण केले. या शेतकऱ्याला राज्य सरकारकडून कर्जमाफीचे प्रमाणपत्र 15 महिन्यांपूर्वीच मिळाले होते. मात्र, कर्जमाफी काही झाली नव्हती. उद्धव यांनी या शेतकऱ्याला पुढे करत राज्यातील फडणवीस सरकारची अक्षरश: पोलखोलच केली. बाळासाहेब सोळंके असे या शेतकऱ्याचे नाव होते.
दरम्यान, ठाकरे यांनी या शेतकऱ्याला जाहीर सभेतून पुढे आणल्यावर सरकारला शेतकऱ्याची गांभीर्याने दखल घेण्यावाचून गत्यंतर राहिले नाही. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर सरकारदरबारी वरिष्ठांनी दखल घेतली आणि सूत्रे हालली. अवघ्या 180 मनीटांत म्हणजे केवळ तीन तासात या शेतकऱ्याच्या खात्यात 70 हजार रुपयांची रक्कम वळती करण्यात आली. या शेतकऱ्यावर 98 हजार रुपयांचे कर्ज होते. या शेतकऱ्याला 15 महन्यांपूर्वीच कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले होते. इतका कालवधी उलटूनही त्याला कर्जमाफी मिळाली नव्हती. प्रत्यक्षात त्याला जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा केवळ तीनच तास पुरले. त्यामुळे या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी केवळ तीनच तास जर लागणार होते तर, मग 15 महिने विलंब का लागला असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दुष्काळामुळे त्यांना कर्जच काय व्याजाची रक्कमही थकली
प्राप्त माहिती अशी की, बाळासाहेब सोळंके हे साडेसहा एकर जमीनेचे मालक आहेत. त्यांच्यासोबत वृद्ध आजी, आई, पत्नी, मुले आणि भावाचे कुटुंब असा परिवार आहे. त्यांनी शेतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धारूर शाखेतून खरिपासाठी ६८,८१४ रुपयांचे कर्ज घेतले. त्यांना ते मिळालेही. कर्जातून मिळालेले पैसे त्यांनी शेतीत गुंतवले. पण, दुष्काळामुळे त्यांना कर्जच काय व्याजाची रक्कमही फेडता आली नाही. त्यामुळे व्याज रुपाने कर्जाचा बोजा वाढत तो 98,950 रुपयांवर पोहोचला. त्यामुळे या कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेत ते होते. दरम्यान, 2017 मध्ये सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे सोळंके यांच्या आशा पल्लवीत झाल्या. (हेही वाचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारची पोलखोल म्हणाले 'सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे थोतांड')
प्रमाणपत्र मिळाले पण, कर्जमाफी नाही
कर्जमाफीच्या निर्णयानंतर सरकारने कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रमही घेतला. यात जिल्हाधिकारी व आमदार सहभागी झाले. बाळासाहेब सोळंके यांनाही २६ ऑक्टोबर २०१७ रोजी कर्जमाफी प्रमाणपत्र मिळाले. पण, प्रमाणपत्र मिळूनही सोळंके यांची प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी झालीच नाही. कर्जमाफी व्हावी यासाठी सोळंके यांनी बँक अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपनिबंधक कार्यालयात अनेक फेऱ्या मारल्या. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
सोळंके यांच्या कर्जमाफीचा तीन तासातील घटनाक्रम
एसबीआयचे शाखा व्यवस्थापक मिलिंद रोटे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, सोळंके यांच्या कर्जमाफीसंदर्भात सरकारचे पत्र बँकेला आले होते. मात्र, ऑनलाईन अर्ज करतेवेळी सोळंके यांचा खाते क्रमांक चुकीचा भरण्यात आला होता. दरम्यान, रोटे यांना बँकेच्या वरिष्ठ कार्यालयातून 5.30 वाजता फोन आला. त्यांना सोळंके यांच्या थकीत कर्जापैकी 70 हजार माफ झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या खात्यावर तशी नोंद झाल्याचेही त्यांना सांगण्यात आले, असे रोटे यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, उद्धव यांनी दुपारी 2 वाजता सोळंके यांना सभेत दाखल केले होते.
सोळंके यांचे बँक खाते एनपीए झाले होते - सुभाष देशमुख, सहकारमंत्री
दरम्यान, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, कर्ज थकल्यामुळे सोळंके यांचे यांचे बँक खाते एनपीए झाले होते. ते खाते बँकिंग नेटवर्कमध्ये आणण्यासाठी सरकारने 58,493 रुपये दिले. आता हे खाते पुन्ह सुरु होईल. ही रक्कम सरकारने बँकेला दिली. मात्र, खात्यासोबत झालेल्या करारामुळे त्यांना 98,687 रुपयांची कर्जमाफी झाली आहे.