Abhijit Bichukale पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात;  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी दाखल केला अपक्ष म्हणून अर्ज
Abhijit Bichukale | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा जागेसाठी आता पोटनिवडणूक (Pandharpur-Mangalvedha Assembly byelection 2021) होणार आहे. भाजपाच्या समाधान अवताडे विरूद्ध भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके या लढतीमध्ये आता अपक्ष म्हणून अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी देखील आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस आहे. त्यावेळी अपक्ष म्हणून अभिजित बिचुकले यांनी अर्ज दाखल केला असून पुन्हा ते निवडणूकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमणार आहेत. Pandharpur-Mangalvedha Constituency By-Election: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी जाहीर; जयंत पाटील यांची माहिती.

राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले अभिजित बिचुकले हे गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या प्रत्येक निवडणूकीमध्ये आपलं नशीब आजमवत असतात. मूळचे सातार्‍याचे असल्याने त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना अनेक निवडणुकीच्या माध्यमातून खुलं आव्हान दिलं आहे. नुकतीच त्यांनी डिसेंबरमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. पण अद्याप एकदाही त्यांच्या पदरामध्ये यश पडलेले नाही. बेताल वक्तव्य आणि अनोख्या अंदाजात अनेकदा समोर आल्याने अभिजित बिचुकले वारंवार चर्चेमध्ये असतात. त्यांचा बिग बॉस मराठी मधील प्रवास देखील वादग्रस्त आणि तितकाच अनेकांसाठी मनोरंजक ठरला होता. Maharashtra Assembly Election 2019: अभिजित बिचुकले यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी तीनपट श्रीमंत; पहा किती आहे बिचुकले दांपत्याची एकूण संपत्ती.

एबीपी माझा सोबत बोलताना अभिजित बिचुकले यांनी 'विठुरायाच्या पंढरपुरामध्ये नेत्यांनी केलेली दुरवस्था बघवत नाही आणि महाराष्ट्रातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आपण पंढरपूर पोट निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करत असल्याचे' त्यांनी सांगितले आहे. मंगळवेढा येथील पाणीप्रश्न आजवर कोणीच का सोडवला नाही असा प्रश्न विचारत आपण या पोट निवडणुकीत निवडून येणार असा विश्वासही अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मागील विधानसभा निवडणूकीमध्ये अभिजित बिचुकले हे वरळी मतदार संघातून शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्या विरूद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते मात्र आदित्य ठाकरेंच्या दणदणीत विजयाने त्यांचे आमदार होण्याचं स्वप्न चक्काचूर झाले होते.