आज संपुर्ण महाराष्ट्रभर कोजागिरीचा उत्साह पाहायला मिळत आहे. कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) म्हणजेच शरद पौर्णिमा (Sharad Purnima). या पौर्णिमेला चंद्राच्या शीतल छायेत आपल्या आप्तलगांसह हा सण साजरा केला जातो. या पौर्णिमेच्या रात्री जागरण केली जाते. लोक एकत्र येऊन चंद्राच्या आल्हाददायक किरणांचा मनसोक्त आनंद लुटतात. या पौर्णिमेला पुण्यात चंद्र बघण्यासाठी पुणेकर उद्यानात सहकुटूंब एकत्र येतात. म्हणून त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून आज कोजागिरी निमित्त पुण्यातील 31 उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
दर वर्षी उत्साही नागरिकांचा प्रतिसाद पाहून, या वर्षीही महापालिकेने रविवारी उद्याने बंद करण्याची वेळ बदलली आहे. पुण्यात सध्या पालिकेची १९९ उद्याने आहेत. यात प्रामुख्याने चित्तरंजन वाटिका, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, कै. तात्यासाहेब थोरात उद्यान, लिम्का जॉगिंग ट्रॅक, मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर उद्यान, छत्रपती बी. टी. शाहू उद्यान, महाराणा प्रताप उद्यान, सारसबाग, वा. द. वर्तक, शहीद मेजर प्रदीप ताथवडे, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान अशी 31 उद्याने नागरिकांसाठी खुली राहणार आहेत.
असं म्हणतात की ऋषिमुनींनी हे जाणले होते की की कोजागिरी पौर्णिमेची चंद्राची किरणे ही शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला या कोमल, शांत, आल्हाददायक चंद्र किरणांचा अनुभव घेण्यासाठी सर्वजण एकत्र येतात व जागरण करतात. हा प्रकाश जो जितका घेईल तितका तो समृद्ध होईल असेही सांगण्यात येते. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची शक्ती आहे. ही शक्ती चंद्राच्या आकारासोबत वाढत जाते.
त्यामुळे असा हा शक्तिशाली चंद्र दूधात पाहिल्यास त्यातही ती शक्ती एकवटून जाते. दूध हे आरोग्यदायी असे पेय आहे. हे पेय आपण प्यायल्यास ती शक्ती आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत अमृतदायी ठरते. थोडक्यात सांगायचे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र किरणांची शक्ती वातावरणात असते आणि जसा चंद्राचा क्षय होतो तशी ही शक्तीही कमी कमी होत जाते. त्यामुळे यंदाची कोजागिरीची मजा सर्वांनी अवश्य लुटा आणि आम्हाला तुमचे अनुभव नक्की सांगा.