Maharashtra Police | (File Photo)

मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना बाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने झटणारे पोलिसही कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले. मागील 24 तासांत महाराष्ट्र पोलिस दलात एकूण 231 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत तब्बल 7,950 पोलिसांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील पोलिस कोरोना व्हायरसच्या कठीण काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता झटले. अनेकदा कर्तव्यापलिकडे जात त्यांनी नागरिकांची मदत केली. सुरुवातीच्या काळात नियमांचे उल्लंघन करत अनेकांनी पोलिसांवर हल्ले देखील केले. परंतु, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असा नियम कडक केल्याने पोलिसांवरील हल्ल्यांना चाप बसला. दरम्यान पोलिसांच्या कार्याचे कौतुकही अनेक स्तरातून करण्यात आले आहे. (येथे पहा: Maharashtra Police Corona Yoddha Documentary)

ANI Tweet:

महाराष्ट्रात सध्या एकूण 4,50,196 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 2,87,030 रुग्ण पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. तर 1,47,018 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यात कोरोना संसर्गामुळे तब्बल 15,842 रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. तर कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांचा आकडाही दिलासादायक आहे. असे असले तरी संकट अद्याप टळलेले नाही त्यामुळे अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.