कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) जीवाची बाजी लावून अहोरात्र काम करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष असलेल्या पोलिसांचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यासह अनेक स्तरावरुन कौतुक होत आहे. दरम्यान सातत्याने कौतुक होत असलेल्या पोलिसांनी कोविड-19 (Covid-19) काळात नेमके कसे काम केले, हे डाक्युमेंटरीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. यासाठी पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'महाराष्ट्र पोलीस कोरोना योद्धा' (Maharashtra Police Corona Yoddha Documentary) डॉक्युमेंटरी तयार केली आहे. यात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र पोलीसांनी राज्यभरात कायदा-सुव्यवस्था कशी राखली. त्याचबरोबर अनेक समस्यांवर मार्ग कसा काढला हे दाखवण्यात आलं आहे. 31 मिनिटं 6 सेकंदाची ही डॉक्युमेंटरी आहे.
'महाराष्ट्र पोलीस कोरोना योद्धा' डॉक्युमेंटरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे शेअर केली आहे. ही डॉक्युमेंटरी शेअर करत गृहमंत्र्यांनी लिहिले, "शासनाच्या सहकार्यातून महाराष्ट्र पोलिसांच्या अविरत सेवेचा आढावा या डॉक्युमेंटरी मधून घेतला आहे. नानाविध भूमिकेतून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अविरतपणे झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मला सार्थ अभिमान आहे."(महाराष्ट्र पोलीस दलात 24 तासात 138 नवे कोरोना रुग्ण, 3 मृत्यू; पहा एकूण आकडेवारी)
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्विट:
या लढाईत महाराष्ट्र शासन सुद्धा अहोरात्र काम करत आहे. शासनाच्या सहकार्यातून महाराष्ट्र पोलिसांच्या अविरत सेवेचा आढावा या डॉक्युमेंटरी मधून घेतला आहे. नानाविध भूमिकेतून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अविरतपणे झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मला सार्थ अभिमान आहे.(२/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 28, 2020
दरम्यान महाराष्ट्रातील 8,722 पोलिस कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यापैकी 1,955 अॅक्टीव्ह रुग्ण असून 6,670 पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील 24 तासांत 138 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 3 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेले पोलिस पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.