वर्षामागून वर्ष सरली पण मुंबई काही सरळ मार्गावर आली नाही. गैरसमज करु नका मात्र आम्ही बोलतोय मुंबईतील खड्ड्यांविषयी. निकृष्ट दर्जाच्या रस्ते बांधकामामुळे मुंबईकरांना पावसाळ्यात दरवर्षी नाहक त्रास सहन करावा लागतो. यात गेल्या काही वर्षांपासून अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. यावर तोडगा म्हणून नवीन वर्षात मुंबईकरांना पालिकेकडून खास भेट मिळणार आहे मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, 2020 मध्ये मुंबईत 230 नवीन सिमेंट काँक्रिटचे रस्ते मिळणार आहेत. आगामी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.
कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाची रस्तेबांधणी होत असल्याने पालिकेला मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने पालिकेची डोकेदुखी आणखी वाढते. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रकाराला कायमचा पायबंद घालण्यासाठी पालिकेने काम पूर्ण झाल्यानंतर 60 टक्के रक्कम देण्याचा तसेच रस्त्याचा हमी कालावधी संपेपर्यंत 40% रक्कम रोखून धरण्याचा निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा- मुंबईत येणार प्लास्टिक चे रस्ते; पुर्नवापरासाठी BMC ने लढविली नामी शक्कल
रस्तेबांधणीत काँक्रिट रस्त्यांचा हमी कालावधी पाच वर्षांचा तर डांबरी रस्त्यांसाठी तीन वर्षांचा आहे. या कालावधीत रस्ते उखडल्यास कंत्राटदाराला जबाबदार धरता येत असल्याने 40 टक्के रक्कम रोखून धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत होणा-या प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने एक नवी शक्कल लढविली होती. ज्यात येत्या काळात मुंबईत प्लास्टिकचे रस्ते बवनण्याची योजना आखत आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, प्लास्टिक रस्त्यांबाबत निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे असे पालिकेचे रस्ते अभियंता संजय दराडे यांनी सांगितले आहे. मुंबईत साचलेल्या प्लास्टिकमुळे गटार, नाल्यात पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे मुंबईत रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साचते. मुंबईत आलेल्या महाप्रलयाचे मुख्य कारणही प्लास्टिक होते. म्हणूनच या प्लास्टिकचा पुर्नवापर असे केल्यास प्लास्टिकचे विघटनही होईल आणि मुंबईकरांची प्लास्टिकमुळे होणा-या प्रदूषणापासून सुटका ही होईल. त्यामुळे रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर करावा असा उपाय सुचविण्यात आला आहे