Horse Smuggling | (Photo Credit- X)

Alcohol Smuggling India: बिहार राज्यातील पश्चिम चंपारण (West Champaran) जिल्ह्यात पोलिसांनी एका घोड्यास ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले आहे. ही नजरकैद म्हणजे घोड्यास मिळालेली एक प्रकारची कोठडीच आहे. त्याचे झाले असे, देशी दारु दारुबंदी असलेल्या राज्यात (Dry State India) चोरट्या मार्गाने नेण्यासाठी तस्कर काहीशी सामान्य पण हटके पद्धत वापरत असल्याचे पुढे आले आहे. बिहार ) पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत आढळून आले की, दारु तस्कर मद्य आणि इतर काही नशील्या पदार्थांची तस्करी (Horse Smuggling) करण्यासाठी चक्क घोड्यांचा वापर करत आहेत. बिहार (Bihar Liquor Ban) पोलिसांनी पश्चिम चंपारण जिल्ह्यात गस्त घालताना काही संशयास्पद घोड्यांची तपासणी केली. या वेळी या घोड्यांवर भारतीय बनावटीच्या परदेशी दारू (IMFL) काही फुगे बांधल्याचे आढळून आले. तस्करांच्या या चलाकीने पोलिसही आश्चर्यचकीत झाले आहेत. पोलिसांनी दारुसह घोडे जप्त केले आहेत.

घोडा सोडून तस्कर पळाला

नौतन पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजताच्या सुमारास गंडक नदीकाठावर एक घोडा रोखण्यात आला. त्याच्यावर लादलेला माल संशयास्पद वाटल्याने त्याची तपासणी केली असता, त्याच्यावर लादलेल्या सामनात मद्याचे फुगे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या घोड्यास दारुसह ताब्यात घेतले. मात्र, घोडामालत असलेला तस्कर अंधाराच्या आडून पळून जाण्यात यशस्वी झाला. हा माल उत्तर प्रदेशातून आणण्यात आला होता. (हेही वाचा, Nagpur Shocker: नागपूरमध्ये घोड्यावर लैंगिक अत्याचार; 30 वर्षीय आरोपीला अटक, गुन्हा दाखल)

कडक गस्तांमुळे तस्करांनी रणनीती बदलली

रस्ते आणि जलमार्गांवर वाढत्या देखरेखीमुळे तस्करांनी नवीन मार्ग अवलंबला आहे. सुरुवातीला नदीकाठच्या पट्ट्यांमधून दारू वाहतूक करण्यासाठी बोटींचा वापर केला जात होता, परंतु नदीतील गस्त वाढविण्यामुळे त्यांना नवीन रणनीती अवलंबण्यास भाग पाडले गेले. आता, घोड्यांसारख्या प्राण्यांचा वापर राज्याच्या सीमा ओलांडून गुप्तपणे दारू वाहतूक करण्यासाठी केला जात आहे.

आरोपीची ओळख पटली, एफआयआरही नोंदवला

तपासादरम्यान, पोलिसांनी नौतन पोलिस हद्दीतील पैरा परसौनी येथील स्थानिक व्यापारी आकाश यादव याला तस्करीच्या प्रयत्नासाठी जबाबदार धरलेआहे. त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे, परंतु आरोपी फरार आहे. कायदेशीर कारवाई सुरू असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे.

घोड्याचा मुक्काम नजरकैदेत; दंड न भरल्यास लीलाव

पोलिसांनी जप्त केलेला घोडा स्थानिक रहिवाशाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे. एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला न्यायालयात आणल्यानंतर त्याच्या देखभालीचा खर्च आरोपीकडून वसूल केला जाईल. जर दंड भरला नाही तर, बिहार उत्पादन शुल्क आणि दारूबंदी कायदा, 2016 अंतर्गत नियमांनुसार घोड्याचा लिलाव केला जाऊ शकतो.

पहिली घटना नाही: दोन महिन्यांपूर्वीचा असाच प्रकार

अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. दोन महिन्यांपूर्वी, त्याच पोलीस ठाण्याच्या परिसरात अशाच प्रकारच्या दारू तस्करीच्या प्रयत्नात आणखी एक घोडा पकडण्यात आला होता. त्या प्रकरणात, राम बाबू पासवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली होती आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर घोडा त्याच्या मालकाकडे परत करण्यात आला होता.

तस्करांसाठी वाहने आणि बोटींचा वापर असुक्षीत

पूर्वी, तस्कर सामान्यतः तेल टँकर, लपवलेल्या डब्यांसह ट्रक, मोटारसायकली आणि कारचा वापर दारू वाहतूक करण्यासाठी करत असत. तथापि, चालू असलेल्या कारवाई आणि वाढत्या देखरेखीमुळे पारंपारिक पद्धती धोकादायक बनल्या आहेत, ज्यामुळे तस्कर घोड्यांसारख्या असामान्य पद्धतींचा अवलंब करतात.

बिहारच्या दारू बंदी कायद्याअंतर्गत कडक अंमलबजावणी

राज्य उत्पादन शुल्क आणि दारू बंदी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुन्हा सांगितले की उत्पादन शुल्क आणि दारू बंदी कायदा, 2016 अंतर्गत दारूचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वाहतूक यावर कडक बंदी आहे. राज्यात तस्करी रोखण्यासाठी विभाग सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे.