ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथे एका 23 वर्षीय महिलेची तिच्या राहत्या घरात हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला घरात तिच्या सहा महिन्यांच्या बाळासोबत असताना तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री वडील कामावरुन परत येईपर्यंत 6 महिन्याचा चिमुकला आईच्या मृतदेहापाशी बसून राहिला होता. (घाटकोपर येथे गाडीला जाण्यासाठी जागा न दिल्याच्या रागातून तरुणाची हत्या)
सिंतदेवी यादव असे या मृत महिलचे नाव असून डोक्यात रॉडने हल्ला करत तिची हत्या करण्यात आली. यावेळी घरात महिला तिच्या सहा महिन्यांच्या बाळासोबत होती. तर तिचा पती कामासाठी बाहेर पडला होता. रात्री 8 च्या सुमारास पती कामावरुन परत आल्यानंतर त्याला घडला प्रकार समजला, अशी माहिती ठाणे पोलिस प्रवक्ता सुखदा नारकर यांनी दिली.
महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.