Coronavirus In Maharashtra: राज्य तुरुंग विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आता पर्यंत एकूण 642 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. यापैकी 408 कैदी उपचार घेऊन कोरोनमुक्त झाले आहेत तर सध्या 234 कैद्यांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे, तुरुंगातील 206 कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 156 जणांनी आजवर कोरोनावर मात केली आहे तर उर्वरित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी महाराष्ट्रातील सर्व तुरुंगाची एकत्रित आहे. या महिन्याच्या सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल जेलमध्ये 181 कैदी आणि 44 जेल कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली होती. तर पुण्याच्या येरवडा जेल मध्ये, नागपूर मध्यवर्ती तुरुंगात सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत होते. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शिक्षा भोगत असणाऱ्या वरावरा राव यांना सुद्धा तळोजा येथील कारागृहात कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ गुन्ह्यातील अनेक कैद्यांना सोडून देण्यात आले होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टंन्सिग राखण्याच्या दृष्टीने तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले होते. तुरुंगातील क्षमता पाहून काही ठिकाणी कैद्यांना हलवण्यात आले होते. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत जाणून घ्या
ANI ट्विट
Till now, 642 jail inmates (408 cured and discharged) and 206 jail staff (156 cured and discharged) have tested positive for COVID19 across jails in Maharashtra: State Prison Department
— ANI (@ANI) July 18, 2020
दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 92 हजार 589 इतकी झाली आहे, तसेच मृतांचा आजवरचा आकडा 11 हजार 452 वर पोहचला आहे. राज्यात आजवर 1 लाख 60 हजार 357 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या राज्यात 1 लाख 20 हजार 480 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.