Wedding Ideas: लग्नकार्यात हळदीला गायली जाणारी, महाराष्ट्राची परंपरा जपणारी सई-बाई पासून अनेक सुरेल गाणी
Haladi Pic (Photo Credits: File)

गेल्या काही वर्षांपासून लग्नसोहळा हा जितका प्रतिष्ठेचा विषय बनत चालला आहे, त्यापेक्षा जास्त महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हळदी समारंभही प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा विषय बनत चालला आहे. पूर्वीच्या काळी लग्नघरात हळदी  समारंभ (Haldi Ceremony) म्हणजे उखळीमध्ये हळकुंड कुटून हळद बनवणे, ते बनवताना छान गाणी, ओव्या म्हणणे यांसारखी अनेक पारंपारिक विधी व्हायच्या. सध्या तो प्रकार कमी होत चालला असून डिजे च्या तालावर, मदयधुंद होऊन नुसता धांगडधिंगा असतो. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो.

हा प्रकार हा महाराष्ट्राची संस्कृती जपणारा नसून केवळ स्वत:च्या सुखासाठी केलेला हा प्रकार आहे. हळदीच्या वेळी आठवण होते ती गावाकडची सुरेल गाणी. ही गाणी हळदी समारंभाची शोभा वाढवतात. तुम्हाला तुमच्या हळदी कार्यक्रमाची शोभा वाढवायची असेल तर ही गाणी नक्की ऐकाच

1. घाणा जी घातिला खंडीभर भाताचा

घाणा जी घातिला खंडीभर भाताचा

मांडव गोताचा दणका भारी

घाणा जी घातिला खंडीभर भाताचा

आधी मान देती कुंकवाला

आधी मान देती हळदीला

2. घाणा भरीला । सवाखंडी सुपारी

मांडवी व्यापारी । गणराज

घाणा भरीला । सवा खंडी गहू

नवर्या मुलीला गोत बहू । गणराज

घाणा भरीला । सवा खंडी भाताचा

नवरा मुलगा गोताचा । गणराज

मांडवाच्या दारी । उभा गणपती

नवर्या मुलाला गोत किती । गणराया

मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण

नवर्या मुलाला केळवण । गणरायाला

मांडवाच्या दारी । रोविल्या ग मेढी

मूळ ग वर्हाडी । आंबाबाई

मांडवाच्या दारी । कोण उभ्यान घास घेतो

चहूकडे चित्त देतो । गणराज

मांडवाच्या दारी । इथ तिथ रोवा

लोडाला जागा ठेवा । माणसांच्या

घाणा भरीला । सवा खंडी कणिक

मांडवी माणीक । आंबाबाई

3. भवरीयो भवरीयो । परतुन जाई चवकियो

भवरीयो राजाराणी । महादेवाच्या घरी यो

पाटाच पाणी सारंगी जातो

हळदीचा लोट पारवा पितो.....

विवाह संस्काराचा प्रारंभ मुलास हळद लावण्याने होतो. त्याची आई, बहिण व नात्यातील बायका त्याला सुगंधी तेलात भिजविलेली हळद लावतात. ह्या रंगतदार समारंभात हळदीची गाणी आणि वाजंत्री यांसह मुलास समारंभपूर्वक आंघोळ घालतात. उर्वरित म्हणजे उष्टी हळद, साडी आणि पूजा साहित्यासह, वधूगृही नेतात. ती हळद मुलीस लावण्यानंतर मुला-मुलीस नवरदेव-नवरी असे संबोधले जाते. या सर्व पारंपारिक विधी शास्त्रानुसार, साग्रसंगीताने झालेले कधीही चांगले.