ताज महाल (फोटो सौजन्य- Pixabay)

देशात कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्ण समोर यायला सुरुवात झाल्यावर सरकारने देशव्यापी लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली होती. जवळ जवळ तीन महिने अनेक गोष्टी बंद होत्या. पर्यटन स्थळे (Tourist Places), स्मारकेही (Monuments) बंद ठेवण्यात आली होती. आता सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत ताज महाल (Taj Mahal), लाल किल्ल्या (Red Fort) सह देशातील स्मारके सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार ने दिलेल्या माहितीनुसार 6 जुलैपासून ही स्मारके उघडण्यात येतील. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृति मंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Prahlad Singh Patel) यांनी याबाबत माहिती दिली. पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी स्मारके आणि इमारती या यादीमध्ये समाविष्ट आहेत.

पीटीआय ट्वीट-

17 मार्च रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआयने 3400 हून अधिक स्मारके बंद केली होती. परंतु नंतर एएसआय अंतर्गत 820 तीर्थेक्षेत्रे उघडली गेली. 6 जुलैपासून उर्वरित स्मारकेही उघडली जाती. मात्र, प्रत्येक राज्यातील कोरोना संसर्ग पाहता ही स्मारके सुरू करायचे की नाही हे राज्य सरकार ठरवू शकते.

याबाबत प्रल्हाद सिंह पटेल यांनी ट्वीट केले आहे. ते लिहितात, ‘सांची (मध्य प्रदेश), पुराना किला (दिल्ली), खजुराहो (जागतिक वारसा) यांसारखी स्मारके 6 जुलैपासून पूर्ण सुरक्षिततेसह उघडली जाऊ शकतात.’ (हेही वाचा: गोवा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज; 250 हॉटेल्ससाठी सरकारने दिली परवानगी, फिरायला जाण्याआधी जाणून घ्या नियम)

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता संस्कृती मंत्रालयाने पुरातत्व विभागाची तिकीट असणारी सर्व स्मारके 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. यानंतर 1 जून रोजी अनलॉक 1 अंतर्गत काही भागात कामांना सूट देण्यात आली,  ज्यामध्ये धार्मिक स्थळेही उघडली गेली. यानंतर आता 1 जुलैपासून अनलॉक 2 अंतर्गत देशात आर्थिक कामे पुन्हा सुरू केले जात आहेत, म्हणूनच या यादीतील पर्यटन स्थळे आणि स्मारके 6 जुलैपासून उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी गोवा सरकारने महत्वाचा निर्णय घेत आजपासून गोवा पर्यटकांसाठी सुरु केले आहे.